महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २६ जुलै । कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पूरस्थितीने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी रविवारी मुख्यमंत्र्यांसह अनेक नेत्यांनी दौरे काढले. या दाैऱ्यात सर्वच नेत्यांनी मदतीच्या आश्वासनांचा ‘पूर’ आणला. मात्र प्रत्यक्षात आपत्तीग्रस्तांसाठी मदत किती व केव्हा मिळणार याबाबत मात्र कुणीही स्पष्टपणे सांगितले नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमधील नुकसानीची पाहणी केली. त्यांच्यासोबत पालकमंत्री अनिल परब व सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत व शिवसेना खासदार विनायक राऊत होते.केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी रायगड जिल्ह्यातील तळिये या दरडग्रस्त गावाला सकाळी भेट दिली. त्यांच्यासोबत विधिमंडळातील दाेन्ही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रवीण दरेकर होते. दुसरीकडे सातारा जिल्ह्यातील देवरूख (ता. वाई) या दरडग्रस्त भागास पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी भेट दिली. शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांसाठी गुरुदत्त कारखान्यावर तात्पुरत्या निवासाची साेय केली आहे, तिथे कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी भेट देऊन त्यांची विचारपूस केली.
मुख्यमंत्री म्हणाले : पश्चिम महाराष्ट्राच्या पाहणीनंतर मदत जाहीर करणार
१. नारायण राणे पंतप्रधान आवास योजनेतून तळिये दरडग्रस्तांना पक्की घरे बांधून दिली जातील.
२. देवेंद्र फडणवीस एनडीआरएफच्या निधीतून दरडग्रस्तांना योग्य ती मदत केली जाईल.
३. उद्धव ठाकरे स्थानिक स्तरावर मदतीसाठी यंत्रणा उभी करणार.
४. बाळासाहेब पाटील : शासन पूरग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.
५. सतेज पाटील छावणीतील नागरिक व जनावरांच्या खाण्याचा खर्च राज्य आपत्ती व्यवस्थापन निधीतून भागवला जाईल.