भाज्या, दूध, चिकनची भाववाढ : अतिवृष्टीमुळे आवक घटली; इंधन दरवाढीचाही परिणाम

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २७ जुलै । करोना टाळेबंदीमुळे अडचणीत आलेला कुक्कुटपालन व्यवसाय, कोंबडीचे खाद्य महागल्याने उत्पादन खर्चात आणि इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्चात झालेली वाढ यांच्या एकत्रित परिणामामुळे चिकनचे दर भडकले आहेत, तर कोल्हापूरला बसलेल्या महापुराच्या तडाख्यामुळे दूधपुरवठा विस्कळीत होऊन दरवाढ झाली आहे. अतिवृष्टीचा फटका बसल्याने भाज्यांचे दर कडाडण्याची शक्यता आहे.

मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक आदी शहरांमध्ये चिकनच्या दरात २० ते ६० रुपयांनी वाढ झाली आहे. अंडय़ांच्या दरातही वृद्धी झाली आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी तसेच महापुरामुळे भाजीमळ्यांची नासाडी झाली आहे. त्याचा परिणाम भाज्यांच्या पुरवठय़ावर झाला असून आवक मोठय़ा प्रमाणावर घटली आहे. आवक घटल्याने त्यांचे भाव वधारण्याची भीती आहे.

पूरग्रस्त कोल्हापूर जिल्ह्य़ातून मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्य़ात होणाऱ्या गोकुळ आणि वारणा दुधाच्या पुरवठय़ात ७० टक्के घट झाली आहे. त्यामुळे या तिन्ही जिल्ह्य़ांत दुधाचा तुटवडा जाणवू लागला असून त्यातूनच काही ठिकाणी कृत्रिम दरवाढ झाल्याचे चित्र आहे.

ऐन आषाढात चिकनचा तुटवडा निर्माण झाला आहे. मागणीच्या तुलनेत आवक कमी होत आहे. त्यामुळे दरात काही ठिकाणी प्रति किलोमागे २० ते ३० रुपयांनी, तर काही ठिकाणी ४० ते ६० रुपयांनी वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात चिकनचे प्रतिकिलो दर २४० ते २५० रुपये आहेत. कोंबडय़ांच्या खाद्यपदार्थाच्या दरात वाढ झाल्यामुळे तसेच अनेक कुक्कुटपालन केंद्रे बंद पडल्यामुळे काही ठिकाणी चिकनचा दर २४० रुपये किलोपर्यंत गेला आहे. महिनाभरापूर्वी हा दर ११५ ते १२० रुपये होता.

करोना टाळेबंदीमुळे राज्यभरातील हॉटेल्स बंद होती. परिणामी, चिकनची मागणी कमी झाल्याने ग्रामीण भागातील कुक्कुटपालन व्यावसायिकांनी पक्षी संगोपन थांबविले होते. साधारणपणे एका पक्ष्याची वाढ होण्यास ४० ते ५० दिवसांचा कालावधी लागतो. आता आषाढ महिना सुरू झाल्यानंतर चिकनच्या मागणीत वाढ झाली आहे; परंतु त्या तुलनेत आवक मात्र कमी आहे, अशी माहिती पुणे जिल्हा ब्रॉयलर संघटनेचे रुपेश परदेशी यांनी दिली.

पुणे जिल्ह्य़ातील पुरंदर, हवेली, शिरूर तसेच खेड भागातील शेतकरी मोठय़ा प्रमाणावर कुक्कुटपालन व्यवसाय करतात. पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह राज्याच्या वेगवेगळ्या भागांत चिकन कंपन्यांना कोंबडय़ांची विक्री केली जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *