पुढच्या महिन्यापासून लहान मुलांचं लसीकरण ; केंद्रीय आरोग्य मंत्री

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २७ जुलै । करोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी करोनाचं संकट काही टळलेलं नाही. त्यामुळे संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता लसीकरणावर जोर दिला जात आहे. . देशात सध्या १८ वर्षांवरील सर्वांचं लसीकरण करण्यात येत आहे. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना सर्वाधिक संक्रमण होईल, अशी शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे लहान मुलांबाबत पालकांना चिंता सतावत होती. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया यांनी दिलासा देणारी बातमी दिली आहे. ऑगस्ट महिन्यात लहान मुलांसाठीची लस भारतात येईल, अशी माहिती त्यांनी भाजपा संसदीय दलाच्या बैठकीत दिली आहे.

“सरकार पुढच्या महिन्यापासून लहान मुलांचं लसीकरण सुरु करणार आहे. तसेच भारत जगातील सर्वाधिक लस उत्पादन करणारा देश होत आहे. कारण अनेक कंपन्यांना लस उत्पादनाचा परवाना देण्यात येत आहे.”, असं केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया यांनी सांगितलं. सध्या भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीची २ वर्षांवरील मुलांवर चाचणी सुरु आहे. ही चाचणी अंतिम टप्प्यात असून त्याबाबत निकाल पुढच्या महिन्यात येणार आहे.

भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनचं लहान मुलांवर सध्या ट्रायल सुरु आहे. त्याचा निकाल लवकरच येईल असं एम्सचे प्रमुख डॉ. गुलेरिया यांनी सांगितलं आहे. दोन वर्षांपासूनच्या मुलांना या लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. आता लसीचा दुसरा डोस पुढच्या आठवड्यात देण्यात येणार आहे. दिल्लीच्या एम्समध्ये ६ ते १२ वयोगटातील मुलांना कोव्हॅक्सिन लसीची दुसरा डोस दिला जाणार आहे. त्यानंतर कोव्हॅक्सिनचा पर्याय उपलब्ध होणार आहे. तर, जायडस कॅडिलाने १२ ते १८ वयोगटातील डीएनए आधारीत करोना लसीचं क्लिनिकल ट्रायल नुकतंच पूर्ण केलं आहे. लवकरच ही लस देशात उपलब्ध होणार आहे. त्यामुळे परवानगी मिळताच हा पर्याय पालकांसमोर असणार आहे. फायजर-बायोएनटेकच्या लसीही प्रतिक्षेत आहेत. भारताकडून मान्यता मिळाल्यास हा पर्यायही उपलब्ध होणार आहे. मॉडर्ना आणि फायजर भारतात लसीचा पुरवठा करण्यापूर्वी इंडेम्निटी क्लॉज करण्यावर जोर देत आहे. यूरोपमध्ये १२ ते १७ वयोगटातील मुलांना मॉडर्ना लस देण्याची मंजुरी देण्यात आली आहे. या लसीचे दोन डोस असणार आहेत. या लसीचं ३ हजार ७३२ मुलांवर परीक्षण करण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *