फाईव्ह जी नेटवर्क चा नाही पत्ता पण भारतात लाँच झाली आहेत ५ जीची ५० मॉडेल्स

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २८ जुलै । फाईव्ह जी नेटवर्क भारतात अजून तरी सुरु झालेले नाही. रिलायंस जिओ आणि एअरटेल युद्ध पातळीवर या नेटवर्कच्या चाचण्या करत आहेत मात्र अजून तरी हे नेटवर्क दृष्टीक्षेपात आलेले नाही. दरम्यान गेल्या १७ महिन्यात भारतीय बाजारात विविध कंपन्यांनी फाईव्ह जी स्मार्टफोनची तब्बल ५० हून अधिक मॉडेल्स लाँच केली आहेत.

भारतात २४ फेब्रुवारी २०२० ला पहिला फाईव्ह जी स्मार्टफोन रिअलमी एक्स ५ जी प्रो आला तेव्हा त्याची किंमत ४४९९९ रुपये होती. वास्तविक हा फोन वर्ल्ड मोबाईल कॉंग्रेस २०२० मध्ये लाँच होणार होता पण हा कार्यक्रम करोना मुळे रद्द झाला आणि हा फोन ऑनलाईन इव्हेंट मध्ये लाँच केला गेला. त्यापूर्वी बार्सिलोना मोबाईल वर्ल्ड कॉंग्रेस २०१७ मध्ये चीनी झेडटीईने त्यांचा पहिला ५ जी फोन गिगाबाईट नावाने सादर केला होता.

भारतात लाँच झालेला दुसरा ५ जी फोन होता विवो सबब्रांड आईकू. हा फोन ४ जी आणि ५ जी अश्या दोन्ही प्रकारात आला त्याची किंमत होती ३६९९० रुपये. गेल्या १७ महिन्यात ५ जी फोनच्या किमती ४४९९९ वरून १३९९९ रुपये अश्या रेंज मध्ये आल्या आहेत. भारतात अजूनही व्यावसायिक पातळीवर ५ जी नेटवर्क सुरु नाही. त्यामुळे ज्या ग्राहकांनी ५ जी फोन खरेदी केले त्यांना या नेटवर्कचा वापर करता आलेला नाही.

स्मार्टफोनचे सर्वसाधारण आयुष्य २ ते ३ वर्षे धरले जाते. वर्षानंतर बॅटरी समस्या, फोन हँग होणे असे प्रकार होऊ शकतात. ज्या ग्राहकांनी २०२० मध्येच असे फोन खरेदी केले त्यांना १७ महिने लोटूनही अजून ५ जी नेटवर्कचा वापर करता आलेला नाही हे लक्षात घेण्यासारखे आहे. शाओमी, रिअलमी ने फाईव्ह जी ची सुमारे २० मॉडेल्स आणली आहेत. ओप्पो ५, अॅपल आयफोन १२ सिरीज, वन प्लस, सॅमसंगचे ८ ते १० मॉडेल्स, मोटोरोला. विवोची अनेक फाईव्ह जी मॉडेल्स भारतीय बाजारात आहेत आपण सर्वसामान्य माणूस फाईव्ह जी नेटवर्कचा वापर कधी करू शकेल याचा अजूनही नक्की अंदाज करता आलेला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *