अतिवृष्टीमुळे पुणे जिल्ह्यात मोठे नुकसान ; भोरला सर्वाधिक फटका, नुकसानीचा आकडा समोर

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २९ जुलै । पूर आणि अतिवृष्टीमुळे (Pune rains) झालेलं नुकसान आता समोर येत आहे. अतिवृष्टीमुळे पुणे जिल्ह्यातील केवळ रस्ते आणि पुलांचे 55 कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने नुकसानीचा हा अंदाज वर्तवला आहे. पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील रस्ते आणि लहान मोठे पूल मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झाले आहेत.

पुणे जिल्ह्यातील तब्बल 260 किलो मीटरचे रस्ते आणि 190 पुलांना पुराचा फटका बसला. महापुरामुळे रस्ते आणि पूल वाहून गेले. त्यामुळे त्यांच्या दुरुस्तीसाठी तब्बल 55 कोटी 49 लाख रुपयांचा निधी लागणार असल्याचा अंदाज सार्वजनिक बांधकाम विभागाने वर्तवला आहे.

जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, मुळशी, भोर आणि वेल्हा या तालुक्यांमध्ये अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झालं आहे. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक फटका भोर तालुक्यातील रस्ते आणि पुलांना बसला आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने प्राथमिक अहवाल तयार केला आहे. यामध्ये तब्बल 260 किलोमीटरचे रस्ते आणि 190 पुलांचे नुकसान झाल्याचं नमूद करण्यात आलं आहे.

कोणत्या तालुक्यात किती नुकसान?
मुळशी 29.76 किलोमीटरचे रस्ते, 47 पूल
भोर 117.85 किलोमीटरचे रस्ते, 33 पूल
वेल्हा 34.47 किलोमीटरचे रस्ते, 16 पूल
जुन्नर 27.32 किलोमीटरचे रस्ते, 35 पूल
आंबेगाव 24 किलोमीटरचे रस्ते, 31 पूल
मावळ 18.35 किलोमीटरचे रस्ते, 16 पूल
खेड 8. 2 किलोमीटरचे रस्ते 12 पूल
एकूण 260.25 किलोमीटरचे रस्ते, 190 पूल

पुण्यात शेतीचे प्रचंड नुकसान पुणे जिल्ह्यात प्रामुख्याने घाटमाथ्यावर झालेल्या अतिवृष्टी व ढगफुटी सदृश्य पावसामुळे जिल्ह्यातील सुमारे साडेचार हजार हेक्टर क्षेत्रातील शेतीचे व शेत पिके आणि जमिनीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजन देशमुख यांनी या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.

पुण्यात आपत्ती व्यवस्थापनाचा मुंबई पॅटर्न
यंदाच्या अतिमुसळधार पावसामुळे राज्यभरात निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आता पुणे महानगरपालिकेने एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पुणे महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन विभाग अद्ययावत करण्यात येईल.

हवामानात होत असलेल्या बदलामुळे अचानक मोठा पाऊस, नाले, नद्यांना पूर आल्याने जिल्हाात बिकट परिस्थिती निर्माण होते. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या धर्तीवर पुण्यात आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा उभारली जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *