पुण्यातील निर्बंधात सूट देण्याची चर्चा, एक-दोन दिवसात निर्णय होईल, गृहमंत्र्यांची माहिती

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३० जुलै । “पुणे जिल्हा लेव्हल 3 मध्ये असल्यामुळे या जिल्ह्यातील निर्बंध कायम आहेत. पुणे जिल्ह्यातील निर्बंध शिथील करण्याबाबत निर्णय झालेला नाही. तथापि पुण्यासाठी काही सूट देता येईल का याबाबत चर्चा सुरु आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्याबाबत चर्चा करुन पुढील एक दोन दिवसात निर्णय घेतील”, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.

दिलीप वळसे पाटील म्हणाले, “आता जे निर्बंध आहेत, ते निर्बंध शिथील करण्याच्या दृष्टीकोनातून, काल आरोग्यमंत्र्यांनी जाहीर केलंय. महाराष्ट्रातील 11 जिल्हे लेव्हल 3 मध्ये आहेत. त्यात पुण्याचा समावेश आहे. त्यामुळे अजून निर्बंध शिथील करण्यास मान्यता दिलेली नाही. तथापि, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचं बोलणं झालेलं आहे. त्यामध्ये पुण्याला निर्बंधामध्ये काही सूट देण्याची चर्चा सुरु आहे. याच्याबाबत निर्णय एक- दोन दिवसात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेतील”

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल महाराष्ट्रातील कोरोना निर्बंधांबाबत महत्वाची घोषणा केली. यानुसार 25 जिल्ह्यांमधील निर्बंध शिथील करण्यात आले. मात्र, निवडक 11 जिल्ह्यांमधील कोरोना संसर्गाची स्थिती पाहता तेथील निर्बंध काय असणार आहेत. गरज पडल्यास कोरोना नियंत्रणासाठी या ठिकाणी निर्बंध वाढवलेही जातील, असं टोपे यांनी सांगितलं.

ज्या 11 जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम आहेत, त्यामध्ये पुणे जिल्ह्याचा समावेश आहे. पुण्यात लेव्हल तीनचे निर्बंध कायम आहेत. मात्र राज्य सरकारच्या या निर्णयाला पुण्यातील व्यापाऱ्यांचा विरोध आहे. आम्ही दुकानं, व्यवसाय सुरु करु असा पवित्रा व्यापाऱ्यांनी केला आहे.

त्याबाबत बोलताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पुण्यासाठी काही सूट देता येईल का याबाबत आरोग्य विभागाकडून अहवाल मागवण्यात आल्याचं सांगितलं. इतकंच नाही तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी बोलून पुढील 2 ते 3 दिवसात निर्णय होईल, असंही वळसे पाटील म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *