महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १ ऑगस्ट । दुचाकीचालकांना हेल्मेट वापर अनिवार्य करण्यात आला आहे. त्यांच्याकडे हेल्मेट नसल्यास त्यांना पेट्रोल मिळणार नाही, या आदेशाची अंमलबजावणी १५ ऑगस्टपासून करण्यात येणार आहे. याबाबत अधिसूचना जारी केली आहे.
राज्य शासनाच्या परिपत्रकानुसार २१ जुलै २०१६ आणि ५ ऑगस्ट २०१६ अन्वये ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’चे धोरण निश्चित केले आहे. त्या अनुषंगाने प्रादेशिक परिवहन यांची जबाबदारी निश्चित केली आहे. तसेच गृह विभागानेही १९ मे १९९० च्या अधिसूचनेन्वये पोलिस आयुक्तांना आयुक्तालय हद्दीसाठी सार्वजनिक सुरक्षा हितासाठी मोटार वाहन चालविण्यावर वाजवी निर्बंध घालण्याचे अधिकार दिले आहेत. त्यानुसार पोलिस आयुक्त दीपक पांडेय यांनी सर्व पेट्रोलपंपमालकांना आदेश देत हेल्मेट परिधान केलेल्या चालकालाच पेट्रोल द्यावे, हेल्मेट नसेल तर इंधन देऊ नये असे धोरण शहर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीसाठी लागू केले आहे. याकरिता पोलिस आयुक्तांनी अधिसूचना काढली आहे. विनाहेल्मेट चालकाला पेट्रोल दिल्यास अशा दुचाकीस्वाराचा नमुना फार्म प्राप्त झाल्यानंतर त्याची चौकशी केली जाणार आहे.
पेट्रोलपंपावर राहणार पोलिस बंदोबस्त : ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’ आदेशाची अंमलबजावणी करताना सुरुवातीचे १५ दिवस पोलिसांकडून पेट्रोलपंपावर बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. सीसीटीव्ही लावण्याचे आदेश असून रेकॉर्डिंग ४५ दिवस जतन करावे लागणार आहे.