पुण्यातील कोरोना हॉटस्पॉट गावांची संख्या वाढली, कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी होणार

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३ ऑगस्ट । गेल्या काही दिवसांमध्ये कडक निर्बंध लादूनही पुणे जिल्ह्यातील हॉटस्पॉट गावांची संख्या कमी होण्याऐवजी त्यामध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आता या गावांमध्ये प्रशासनाकडून कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील 42 गावांमध्ये कोरोनाचे (Coronavirus) रुग्ण वाढल्याने हे परिसर कोव्हिड हॉटस्पॉट झाले आहेत. या पार्श्वभूमीवर ख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी गावातील प्रत्येक घरात जाऊन सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

ग्रामीण भागाचा रुग्णबधितांचा दर आणि हॉटस्पॉट गावांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा परिषदेतर्फे धडक सर्वेक्षण मोहीम हाती घेण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात हॉटस्पॉट गावे ही 100 च्या आत होती. मात्र, आता ती 109 वर पोहचली आहे. परिणामी ग्रामीण भागातील पॉझिटिव्हीटी रेट अद्याप पाच टक्क्यांच्या खाली आलेला नाही.

पुण्याच्या शहरी भागात कोरोनाचा टक्का घसरला
पुण्यातील शहरी भागात कोरोना संसर्गाचा टक्का घसरल्याचे समोर आले आहे. जुलैमध्ये महिन्यात सरासरी कोरोना प्रसाराचा दर पाच टक्क्यांपेक्षा कमी राहिला. फेब्रुवारी महिन्यात काही दिवस अशी स्थिती होती, पण त्यानंतर आलेल्या दुसऱ्या लाटेने नवे उच्चांक प्रस्थापित केले.
जुलै महिन्यात शहरात कोरोनाच्या प्रसाराच्या दराबरोबरच मृत्यूच्या संख्येतही घट झाली. दुसऱ्या लाटेत ज्या वेगाने मृत्युदर आणि रुग्णसंख्या वाढली, त्याच वेगाने ती कमी झाली.

पुण्यात कोरोना लसींचा तुटवडा
राज्य सरकारकडून महापालिकेला लसीचा पुरवठा उपलब्ध न झाल्याने पुणे शहरातील लसीकरण आज बंद ठेवण्यात आले आहे. फक्त सात ठिकाणी कोव्हॅक्सिनचे 2300 डोस उपलब्ध असणार आहेत. कमला नेहरू रुग्णालयात परदेशात जाणारे विद्यार्थी व स्पर्धा परीक्षा देण्यासाठी दिल्लीला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 500 डोस उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.

तर पिंपरी चिंचवडमध्ये 18 वर्षांपुढील नागरिकांना आज ‘कोविशिल्ड’चा फक्त दुसरा डोस मिळणार आहे. किऑस्कद्वारे टोकन घेतलेल्या, ऑनलाइन पद्धतीने बुकिंग केलेल्या आणि कोविन ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अ‍ॅपद्वारे नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांचेच लसीकरण आज पार पडणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *