निर्बंध शिथिल होताच शेअर बाजारात झळाळी, निफ्टी पहिल्यांदा 16 हजारांच्या पार

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ४ ऑगस्ट । महाराष्ट्र सरकारने कोरोनाचे निर्बंध शिथिल करताच शेअर बाजाराला पुन्हा झळाळी आली आहे. मंगळवारी निफ्टीने इतिहासात पहिल्यांदा 16 हजार अंकांचा टप्पा पार केला, तर सेन्सेक्सने 53 हजार 888 अंकांचा उच्चांक नोंदवला. आठवडय़ाच्या सुरुवातीलाच सलग दुसऱया दिवशी शेअर बाजाराने नवा विक्रम रचला. राज्य सरकारच्या निर्णयामुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले आहे.

जुलैमध्ये मजबूत आर्थिक निर्देशांकांनी शेअर बाजाराला भक्कम आधार दिला आहे. सोमवारप्रमाणेच मंगळवारीही बाजारात उत्साह दिसला. दिवसाच्या सुरुवातीला सेन्सेक्सने 53,888 अंकांची विक्रमी पातळी गाठली होती. पुढे दिवसअखेर सेन्सेक्स 872.73 अंकांनी वधारून 53,823.36 अंकांच्या पातळीवर बंद झाला. तसेच निफ्टीने मधेच 16,147 अंकांच्या ऐतिहासिक पातळीवर उसळी घेतली होती. दिवसभराचे सत्र संपताना 245 अंकांच्या तेजीसह निफ्टी बंद झाली. सेन्सेक्समध्ये सामील झालेल्या 30 पैकी 27 शेअर्सच्या किमतीत मोठी वाढ झाली. शेअर बाजाराला एफएमसीजी, औषधे आणि वाहन क्षेत्राने भक्कम आधार दिला. एनएसईवर तिन्ही इंडेक्समध्ये 1 टक्क्यापेक्षा अधिक वाढ नोंद झाली. औषध क्षेत्रामध्ये सन फार्माचा शेअर 2.19 टक्क्यांनी वाढून 792 अंकांवर बंद झाला. एफएमसीजी सेक्टरमध्ये नेस्ले इंडियाचा शेअर 3.29 टक्क्यांच्या उसळीसह 18,298 अंकांवर बंद झाला. तसेच वाहन क्षेत्रात टय़ूब इन्व्हेस्टमेंटचा शेअर 5.80 टक्क्यांच्या तेजीसह 1,165 अंकांच्या पातळीवर बंद झाला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *