अकरावी प्रवेश सीईटी 21 रोजी होणार, मुदतवाढ नाही; प्रत्येक केंद्रावर 300 विद्यार्थ्यांची व्यवस्था

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ४ ऑगस्ट । अकरावी प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटीसाठी राज्यातून सुमारे १२ लाख विद्यार्थी प्रविष्ट होणार असून, प्रत्येक परीक्षा केंद्रावर ३०० विद्यार्थ्यांप्रमाणे सीईटीचे नियोजन करण्यात येईल. सध्याच्या वेळापत्रकाप्रमाणेच २१ ऑगस्ट रोजी सीईटी परीक्षेचे नियोजन सुरू आहे,’ अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी मंगळवारी दिली. सीईटीसाठी सुमारे ११ लाख ९६ विद्यार्थ्यांची नोंदणी पूर्ण झाली आहे, तर काही विद्यार्थ्यांचे अर्ज शुल्क प्रक्रियेमुळे संगणकीय प्रणालीत अपडेट व्हायचे आहेत. सीईटीच्या नोंदणीसाठी अर्ज करायला मुदतवाढ द्यावी, अशी कोणाचीही मागणी राज्य मंडळाकडे आलेली नाही. त्यामुळे आता सीईटीसाठी अर्ज करण्याला मुदतवाढ देण्यात येणार नसल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.

मंडळाने सीईटी परीक्षेसाठी वेबसाइटवरून ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्याची सुविधा २० जुलैपासून उपलब्ध करुन दिली. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे ही सुविधा २१ जुलैपासून बंद ठेवण्यात आली. त्यानंतर मंडळाने https:/cet.11thadmission.org.in या नव्या वेबसाइटवरून २ ऑगस्टपर्यंत अर्ज भरण्याची सुविधा पुन:श्च उपलब्ध करून दिली होती. सोमवारी रात्रीपर्यंत ११ लाख ९६ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी पूर्ण झाली आहे. अनेक विद्यार्थ्याच्या अर्जाची माहिती संगणकीय प्रणालीत अपडेट होत असल्याने, राज्यातून बारा लाखांहून अधिक विद्यार्थी सीईटी देतील. त्यामुळे राज्यात एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी प्रविष्ट होण्याची ही पहिलीच वेळ असेल. मंडळाने सध्याच्या वेळापत्रकानुसार २१ ऑगस्ट रोजी सीईटी घेण्याचे निश्चित केले आहे. त्यामध्ये काही बदल झाल्यास, त्याची माहिती आवश्यकतेप्रमाणे प्रसिद्ध करण्यात येईल, अशी माहिती पाटील यांनी दिली आहे.

घराजवळील परीक्षा केंद्र मिळणार
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनही संपलेला नाही. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांची सुरक्षित वातावरणात परीक्षा घ्यावी लागणार आहे. त्याचे नियोजन मंडळाकडून करण्यात येत आहे. सुरक्षित अंतराचे नियम पाळून एका परीक्षा केंद्रावर साधारण ३०० विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येईल. विद्यार्थ्यांना त्यांच्या घराजवळीत परीक्षा केंद्र देण्याचा प्रयत्न मंडळाकडून करण्यात येईल, असे पाटील यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *