महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ४ ऑगस्ट । मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर एचडीएफसी बँकेच्या (HDFC Bank) नोकरीची जाहिरात (Job Vacancy Advertisement) चांगलीच व्हायरल (Viral) झालं आहे. कोविड काळात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी (2021 passed out candidates) या नोकरीसाठी अर्ज करू नये (not eligible), असं स्पष्टपणे संबंधित जाहिरातीत लिहिण्यात आलं होतं. ही जाहिरात वर्तमानपत्रात प्रसिद्ध केल्यानंतर काही वेळातचं सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. यानंतर अनेकांनी एचडीएफसी बँकेनं घातलेल्या अटीवर टीका केली होती. वाढती टीका लक्षात घेऊन बँकेनं स्पष्टीकरण दिलं आहे. तसेच नवीन जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
खरंतर, मागील दीड वर्षांपासून देशात कोरोना विषाणूनं थैमान घातलं आहे. त्यामुळे देशातील शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहे. दरम्यान बहुतांशी ठिकाणी ऑनलाइन क्लासचा पर्याय अवलंबला आहे. असं असलं तरी देशातील अनेक शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांच्या आधीच्या वर्गात मिळालेल्या गुणांवर आधारित गुण देऊन पास केलं आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना भविष्याची चिंता लागली आहे. अशात एचएडीएफसी बँकेची नोकर भरतीची एक जाहिरात व्हायरल झाली.
संबंधित जाहिरात एचडीएफसी बँकेच्या तमिळनाडूतील मदुराई शाखेनं काढली होती. ज्यामध्ये 2021 मध्ये पास झालेल्या विद्यार्थ्यांनी अर्ज करू नये, अशी अट ठेवण्यात आली होती. पण अवघ्या काही मिनिटांत ही जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल झाली. यामुळे अनेकांनी एचडीएफसी बँकेवर टीका केली आहे. यानंतर आता बँकेनं याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.
झी न्युजने दिलेल्या वृत्तानुसार, बँकेनं आपली चूक मान्य केली आहे. तसेच जाहिरात टाईप करत असताना, त्यामध्ये चूक झाल्याचं म्हटलं आहे. तसेच बँकेनं आता एक वेगळी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ज्यामध्ये 2021 साली पास झालेले विद्यार्थी अर्ज करू शकतात, असंही त्यामध्ये लिहिण्यात आलं आहे. त्याचबरोबर झालेल्या चुकीबद्दल बँकेकडून खेदही व्यक्त करण्यात आला आहे.