Ashadha Amavasya 2021 : आषाढ अमावस्येचे महत्व ; शास्त्रशुद्ध विधीने दिव्यांची पूजा कशी करावी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ५ ऑगस्ट । येत्या रविवारी म्हणजे ८ ऑगस्ट रोजी आषाढ अमावस्या आहे. ही अमावस्या दिव्यांची आवस म्हणूनही ओळखली जाते. या दिवशी दिव्यांची पूजा करायची असते. त्या पूजेचा विधी जाणून घेण्यापूर्वी ही दीपपूजा का व कशासाठी ते जाणून घेऊ…

आपले जे दैनंदिन संस्कार आहेत, त्यात संध्याकाळी देवापुढे समई लावून ‘दिव्या दिव्या दिपत्कार…’ हा श्लोक म्हणून दिव्याची प्रार्थना करतो. हा संस्कार आजही सर्व कुटुंबात पाळला जातो. तिन्ही सांजेला संस्कारी घरातून `शुभं करोतिचे’ मंजुळ सूर कानी पडतात. काही ठिकाणी ही प्रार्थना घरातील लहानथोर मिळून करतात. त्यामुळे अशा घरात रोजच दीपपूजा होते. मात्र ज्या घरांमध्ये असे होत नाही, त्यांनी दीप अमावस्येपासून हा संस्कार अंगवळणी पाडून घ्यावा, असा शास्त्रसंकेत आहे. प्रकाशाचे महत्त्व अंधारात कळते. लाईट गेले की एका मेणबत्तीवर प्रकाशाची भिस्त असते. अशा प्रकाशाची पूजा करून आपले जीवन प्रकाशमयी व्हावे, ही कृतज्ञता या पूजेत आहे.

आषाढी अमावस्येला घरातील सर्व दिव्यांची आरास मांडून पूजा केली जाते. पूर्वी विजेचे दिवे नसल्याने घरात अनेक दिवे असत. आज विजेमुळे घरात समई, निरांजन, पणती असे मोजके दिवे असतात. त्या दिव्यांना स्वच्छ करून, उजळून घ्यावे असे शास्त्रकार सांगतात. अनेक ठिकाणी या दिवशी पिठाचे दिवे प्रज्वलित करून त्यांचीही पूजा केली जाते.

नित्य व नैमित्तिक पूजेतही दीपपूजन केले जाते. यावरून दीपपूजेचे धार्मिक व सांस्कृतिक असे दोन्हीही दृष्टीने महत्त्व लक्षात येते. दिव्याच्या प्रकाशाने नेहमी अंधाराचे निवारण होते. दिव्याच्या प्रकाशाने वस्तू उजळून निघते. तेजोमय दिसते. म्हणून दिवा हे मांगल्याचे, शुभंकरतेचे प्रतिक आह़े दीपपूजेने आंतरिक अज्ञानही दूर होते. शत्रुबुद्धी नष्ट होते. विकार कुंठित होतात. दिवा हे ज्ञानाचे द्योतक आहे. दीपतेजाने बुद्धी स्थिर राहते. शिवाय ज्ञानाच्या एका दिव्याने हजारो दिवे लावता येतात. विजेचे दिवे कितीही सुंदर व शक्तिशाली असले तरीही त्या दिव्यांनी इतर दिवे प्रकाशित होऊ शकत नाहीत. आपल्या वैदिक संस्कृतीत म्हणून दीपपूजेला मोठे महत्त्व आहे.

या दिवशी घरातील सर्व दिवे स्वच्छ केले जातात. त्यानंतर ते देवापुढे ठेवून दिव्यांभोवती रांगोळ्या काढतात. दिवे तेवूनच त्यांची गंध-फुलं-धूप अर्पून पूजा केली जाते व त्यास मनोभावे नमस्कार केला जातो. दिव्यांना दूध-साखरेचा नैवेद्य दाखवून लाह्या अर्पण केल्या जातात. अशी यथासांग पूजा करून दिव्यांचे तेज आपल्याला मिळून आपले अज्ञान, अंधकारमय आयुष्य उजळून निघावे, अशी प्रार्थना करावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *