महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ६ ऑगस्ट । लसींच्या टंचाईमुळे जनतेच्या रोषाला तोंड देत असलेले केंद्र सरकार कोव्हिशिल्ड लसीच्या डोसमधील अंतर पुन्हा कमी करणार आहे. या लसीचा दुसरा डोस दोन ते चार आठवडय़ांच्या आत देण्याचा सरकारचा विचार आहे. सुरुवातीला 45 वर्षांपुढील लोकांनाच ही सूट दिली जाणार आहे. याबाबत पुढील दोन आठवडय़ांत अंतिम निर्णय घेतला जाईल, असे कोविड-19 वर्किंग ग्रुपचे अध्यक्ष डॉ. एन. के. अरोरा यांनी गुरुवारी एका मुलाखतीत सांगितले.
कोरोना लसीकरणासंबंधी नॅशनल टेक्निकल अॅडव्हायजरी ग्रुपची पुढच्या आठवडय़ात बैठक होणार आहे. त्या बैठकीत कोव्हिशिल्ड लसीच्या डोसमधील अंतर कमी करण्याबाबत चर्चा केली जाणार आहे. वेगवेगळय़ा वयोगटांतील लोकांवर कोरोना लसी व त्यांच्या दोन डोसमधील अंतराचा नेमका काय परिणाम झाला याची माहिती सध्या गोळा केली जात आहे. कोव्हिशिल्डच्या एका डोसने मजबूत प्रतिकारशक्ती सिद्ध केली आहे. याच शास्त्रीय निष्कर्षांच्या आधारे कोव्हिशिल्डच्या दोन डोसमधील अंतर कमी करण्याचा विचार केला जात आहे, असे डॉ. अरोरा यांनी स्पष्ट केले आहे. देशात सध्या सर्व प्रौढ नागरिकांना कोव्हिशिल्डचा पहिला डोस घेतल्यानंतर तीन ते चार महिन्यांनी दुसरा डोस दिला जात आहे. मात्र हे अंतर वाढवूनही लसींच्या उपलब्धतेची बोंब आहे. याचदरम्यान आता कोव्हीशिल्डच्या दोन डोसमधील अंतर पुन्हा कमी केले जाणार आहे.