मंत्रिमंडळाच्या बैठकीत ‘या’ मुद्द्यांवर होणार महत्त्वाची चर्चा, काय होणार नवी घोषणा?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ११ऑगस्ट । राज्य मंत्रिमंडळाची (Cabinet Meeting) बैठक आज दुपारी साडेतीन वाजता सह्याद्री अतिथीगृह येथे होत आहे. आजच्या बैठकीत राज्यातील महत्त्वाच्या काही घडामोडींवर चर्चा होणार आहे अशी माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे येत्या 15 ऑगस्ट रोजी 75 वा स्वातंत्र्यदिन (Independence Day) देशात साजरा केला जात असताना राज्य सरकार वेगळ्या पद्धतीने साजरा करता येईल याबाबत महत्त्वाचा निर्णय होईल. आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील पूरग्रस्तांच्या संदर्भात काही महत्त्वाच्या घोषणा देखील अपेक्षित आहेत.

राज्य सरकारने यापूर्वी जाहीर केलेल्या साडेअकरा हजार कोटी रुपयांच्या पॅकेजच्या संदर्भात आढावा घेतला जाणार असून राज्यात पंचनामे करण्यात आलेल्यांची आकडेवारी देखी राज्य मंत्रिमंडळासमोर मांडली जाणार आहे. पंचनामे झालेल्या पूरग्रस्त लोकांना राज्य सरकार जाहीर केलेल्या पॅकेजमध्ये अंतर्भूत करून मदत जाहीर केली जाईल. तसेच यापूर्वी जाहीर केलेल्या पॅकेज संदर्भात नेमकी मदत कोठे किती प्रमाणात मिळाली याचा देखील आढावा आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला जाणार आहे.

राज्यातील कोविडच्या संदर्भात देखील आज आढावा घेतला जाणार असून टास्क फोर्सने केलेल्या सूचना तसेच राज्यात 15 ऑगस्टपासून सुरू होणारी मुंबईतील लोकांना लोकल सेवा आणि राज्यात काही भागांमध्ये शाळा सुरू करण्यात येणार आहेत त्यादेखील याबाबतची चर्चा आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत होईल अशी माहिती समोर येत आहे. केंद्र सरकारने आरक्षणासंदर्भात राज्य सरकारला दिलेले अधिकार त्याबाबत केलेले विधेयक मंजुरी याचे देखील पडसाद आजच्या बैठकीमध्ये उमटले जाण्याची शक्यता आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मराठा आरक्षणाच्या संदर्भात देखील पुढच्या कालावधीमध्ये राज्य सरकारला कोणती पावले उचलावी लागणार आहेत याबाबत चर्चा होईल. त्याचवेळी उपस्थित नेतृत्व करत असलेले मंत्री ओबीसी राजकीय आरक्षणाच्या संदर्भात मुद्दा उपस्थित करण्याची शक्यता आहे यामुळे आजची मंत्रिमंडळाची बैठक महत्त्वाची असून कोणकोणत्या विषयांवर चर्चा होत आहे याकडे लक्ष आहे. आजच्या कॅबिनेट बैठकीत राज्यातील राजकीय घडामोडींचे पडसाद देखील उमटण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *