टी-20 विश्वचषकानंतर भारतीय क्रिकेटमध्ये मोठा बदल होऊ शकतात , शास्त्रींचे कॉन्ट्रॅक्ट संपत आहे

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ११ ऑगस्ट । भारतीय क्रिकेट संघाविषयी एक मोठी बातमी समोर येत आहे. वास्तविक, टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री लवकरच टीम इंडियाचे प्रशिक्षकपद सोडू शकतात. यावर्षी ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या टी -20 विश्वचषकानंतर शास्त्री, गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर आणि फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड टीम इंडियापासून वेगळे होऊ शकतात.

शास्त्रींनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) याबाबत माहितीही दिली आहे. शास्त्रींसह संपूर्ण कोचिंग स्टाफचा कार्यकाळही नोव्हेंबरमध्ये संपत आहे. इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार, बीसीसीआयला टी 20 विश्वचषकानंतर नवीन कोचिंग स्टाफ नेमण्याची इच्छा आहे, जेणेकरून भारतीय क्रिकेटला एका नवीन उंचीपर्यंत नेले जाऊ शकेल.

रवी शास्त्री पहिल्यांदा 2014 साली टीम इंडियामध्ये डायरेक्टर म्हणून सामील झाले. त्यांचा करार 2016 पर्यंत होता. त्यानंतर शास्त्री यांची एका वर्षासाठी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली. अनिल कुंबळेनंतर 2017 साली ते टीम इंडियाचे पूर्णवेळ प्रशिक्षक झाले. त्यावेळी शास्त्रींचा कार्यकाळ 2019 च्या एकदिवसीय विश्वचषकापर्यंत होता. 2019 मध्ये चांगल्या कामगिरीनंतर शास्त्रींचा करार 2020 च्या टी -20 विश्वचषकापर्यंत वाढवण्यात आला होता.

गेल्या वर्षी कोरोनामुळे टी-20 विश्वचषक होऊ शकला नाही, परंतु या वर्षी होणाऱ्या टी-20 विश्वचषकानंतर शास्त्रींचा कार्यकाळ संपेल. मीडिया रिपोर्टनुसार, राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे (NCA) संचालक राहुल द्रविडला संघाचे नवीन मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले जाऊ शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *