मुंबई-पुण्यातील वाहतूक कोंडी ५० टक्क्यांनी कमी होणार; नितीन गडकरींची मोठी घोषणा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १२ ऑगस्ट । केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई-दिल्ली हायवे वरळी सी-लिंकला जोडणार असल्याची घोषणा केली आहे. वरळी सी लिंकपर्यंत दिल्ली-मुंबई हायवेला पोहोचवण्याचे स्वप्न असून त्यासाठी ५० हजार कोटींचा उड्डाणपूल समुद्रात बांधण्याची योजना असल्याची माहिती नितीन गडकरी यांनी एबीपी माझाच्या कार्यक्रमात बोलताना दिली आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग, वरळी-वांद्रे सी लिंक, ५५ उड्डाणपूल अशी अनेक काम केली. त्या काळात बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, नारायण राणे असे सर्वजण होते. पण एक गोष्ट राहून गेली. मला वरळी-वांद्रे सी लिंक वसई विरारच्या पलीकडे नेऊन दिल्ली-मुंबई हायवेला जोडायचा होता. आता मी दिल्ली-मुंबई हायवे एक लाख कोटींचा बांधत असून तो जेएनपीटीपर्यंत आहे. त्याचे ६० टक्के काम पूर्ण झाले आहे. त्या हायवेला वरळी सी लिंकपर्यंत पोहोचवण्याचे माझे स्वप्न आहे. त्यासाठी ५० हजार कोटींचा उड्डाणपूल समुद्रात बांधण्याची योजना असल्याची माहिती त्यांनी दिली.

यासंदर्भात महाराष्ट्र सरकारशी चर्चा करणार असून संमती मिळाल्यास हा पूल बांधायला घेणार आहोत. त्यावर अभ्यास सुरु झाला आहे. हा पूल असता तर वेस्टर्न एक्स्प्रेस-वेवर गर्दी झाली नसती. हा पूल झाला नाही याचे शल्य आहे, त्यामुळे हा पूल बांधायचे डोक्यात असल्याचेही ते म्हणाले. मुंबईत मेट्रोच्यावरही पूल झाले असते तर वाहतुकीची कोंडी सुटली असती. पण वरळी वांद्रे सी-लिंक प्रोजेक्ट करुन रस्ता वाढवू. कारण ही मुंबईची लाइफलाइन असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी सूरत-नाशिक-अहमदनगर-सोलापूर रस्त्याला मंजुरी देण्यात आली असून यामुळे मुंबई-पुण्यातील वाहतूक कोंडी ५० टक्क्यांनी कमी होईल, अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली. तसेच समृद्धी महामार्गाच्या बाजूने मुंबई आणि पुण्याच्या धर्तीवर २५ ते ३० लाखांची नवी पाच शहरे विकसित करण्याची आवश्यकता असल्याचे नितीन गडकरींनी सांगितले. मुंबई, पुण्याच्या विकासाऐवजी इतर जे टू-टायर सिटी आहेत, त्याचा विकास करणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले.

वाहतूक कोंडी मुंबई-दिल्ली एक्स्प्रेस हायवेमुळे कमी होईल. तसेच येत्या सहा महिन्यात फ्लेक्सी इंजिन आणणार, पूर्णपणे इथेनॉलवर चालणारे इंजिन अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली. तसेच महाराष्ट्र प्रगतीशील आणि समृद्ध राज्य असल्यामुळे आपली ताकद आणि त्रुटी समजून घेण्याची गरज आहे. पायाभूत सुविधांचा विचार करक मुंबईचा विकास केला पाहिजे. मुंबईला तिन्ही बाजूने समुद्र असून विकास होण्यासाठी जागाच शिल्लक राहिलेली नाही. नवी मुंबईतही गर्दी झाली आहे. त्यामुळे मुंबईतील उद्योग-व्यवसायाचे महाराष्ट्रात विकेंद्रीकरण झाले, तर राज्याचा विकास होईल. महाराष्ट्र सरकारने सल्लामसलत करुन पुढील २५ वर्षांचे व्हिजन डॉक्यूमेंट तयार केले पाहिजे. अंमलबजावणी केली, तर महाराष्ट्र अजून पुढे जाईल आणि गरिबी, भूकबळी यातून मुक्त होईल, असा विश्वास नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *