संशोधकांचा दावा; काही वर्षांत करोनाला येणार साध्या सर्दीपडशाचे रूप;

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १३ ऑगस्ट । वॉशिंग्टन: येत्या काही वर्षांमध्ये करोना साध्या सर्दीपडशाचे रूप धारण करू शकतो. त्याची लागण प्रामुख्याने लसीकरण न झालेल्या आणि या विषाणूच्या संपर्कात आलेल्या मुलांना होऊ शकते, असा निष्कर्ष एका प्रारूप अभ्यासाअंती वर्तवण्यात आला आहे.

अमेरिका आणि नॉर्वेतील संशोधकांच्या संयुक्त पथकाचा अभ्यास अहवाल गुरुवारी जाहीर करण्यात आला. ‘करोनाची तीव्रता मुलांमध्ये सामान्यतः कमी असल्याने, या आजाराचा एकूण भार कमी होण्याची अपेक्षा आहे. सार्स संसर्गानंतर वयानुसार वाढत्या गंभीर परिणामांचे आणि मृत्यूचे स्पष्ट चिन्ह दिसत आहे. तरीही, आमच्या अभ्यासातून असे निष्कर्ष मिळाले आहेत, की संसर्गाचा धोका आता लहान मुलांकडे वळू शकतो. लसीकरणामुळे किंवा विषाणूच्या संपर्कात आल्यामुळे प्रौढांची रोगप्रतिकारकशक्ती वाढली आहे,’ असे नॉर्वेतील ओस्लो युनिव्हर्सिटीतील ओट्टर ब्योर्नस्टॅड यांनी सांगितले.

संशोधकांनी तत्काळ (एक वर्ष), मध्यम (१० वर्षे) आणि दीर्घ (२० वर्षे)कालावधीत होणाऱ्या करोना संसर्गाचे विश्लेषण केले. त्यासाठी चीन, जपान, दक्षिण कोरिया, स्पेन, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, इटली, अमेरिका, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका या देशांमधील करोना संसर्गाच्या तीव्रतेचा संयुक्त राष्ट्रांकडील आकडेवारीच्या आधारे अभ्यास करण्यात आला.

दरम्यान, अमेरिका, ब्रिटनमध्ये ही भीती काही प्रमाणात खरी होताना दिसत आहे. आधीच्या तुलनेत लहान मुलांमधील करोनाबाधितांची संख्या वाढली असल्याचे समोर आले आहे. भारतासाठीदेखील ही बाब चिंताजनक ठरू शकते. युनिर्व्हसिटी ऑफ ब्रिस्टलचे बाल रोग तज्ज्ञ प्रा. अॅडम फिन्न यांनी सांगितले की लहान मुलांमध्ये करोनाचा धोका कमी झालेला नाही. करोनाबाधित लहान मुलांची संख्या वाढत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे हा आजार पहिल्या दोन लाटेच्या तुलनेने वेगळा असल्याचे त्यांनी म्हटले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *