पुणे- लोणावळा लोकल सुरू होणार; असा मिळवा पास

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १८ ऑगस्ट । सामान्य प्रवाशांसाठी पुणे-लोणावळा आणि पुणे-दौंड डेमूची सेवा सुरू करण्यासाठी पात्र प्रवाशांना ओळखपत्र देण्यासाठी महापालिका प्रशासनाने कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. मात्र, सोमवारी नेमणुकीचा आदेश काढल्यानंतरही मंगळवारी हे काम सुरू झाले नव्हते. त्यामुळे पुणेकरांना अजूनही ओळखपत्रांची प्रतीक्षाच आहे.

पुणे-लोणावळा लोकल आणि पुणे-दौंड डेमू सुरू करण्यासंबंधीचा आदेश राज्य सरकारने नुकताच काढला होता. त्यानुसार जिल्हा प्रशासन आणि महापालिकेनेही आदेश काढला. त्यानुसार १५ ऑगस्टपासून सेवा सुरू होणे अपेक्षित होते. मात्र, प्रत्यक्षात दोन दिवस उलटल्यानंतरही सेवा सुरू झालेली नाही. त्यानंतर महापालिकाने १६ ऑगस्टला रात्री उशिराने लोकल प्रवासासाठी पात्र नागरिकांना ओळखपत्र देण्यासाठी कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. पुणे स्टेशन आणि शिवाजीनगर रेल्वे स्थानकात दोन शिफ्टमध्ये १६ कर्मचारी कार्यरत असणार आहेत. दरम्यान, ग्रामीण भागातील नागरिकांच्या लोकल प्रवासासाठी आवश्यक कार्यवाही करण्याची जबाबदारी तेथील स्थानिक प्रशासनाची असणार आहे, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

लोकल प्रवासासाठी पात्र प्रवाशांना पास देण्यासाठी ढोले-पाटील क्षेत्रीय कार्यालय आणि घोले रोड क्षेत्रीय कार्यालयातील सहायक आयुक्तांना नोडल अधिकारी म्हणून नेमले आहे. त्यांच्या अंतर्गत टीम काम करणार आहे. यातील ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त ज्ञानदेव सुपे यांच्याकडे विचारणा केली असता, ‘सोमवारी रात्री उशिरा आदेश काढल्यामुळे मंगळवारी अनेकांना त्याची माहितीच नव्हती. त्यामुळे ते कर्मचारी हजर झाले नाहीत. कर्मचारी हजर झाल्यानंतरच काम सुरू करता येणार आहे,’ असे त्यांनी ‘मटा’ला सांगितले.

लोकल प्रवासासाठी पात्र नागरिकांना केवळ मासिक पास दिले जाणार असल्याचे महापालिकेच्या आदेशात नमूद केले आहे. दररोज अप-डाउन करणाऱ्या प्रवाशांना मासिक पास फायदेशीर आहे. मात्र, काही कामानिमित्त पुणे, पिंपरी-चिंचवड, तळेगाव, लोणावळा किंवा पुणे-दौंड दरम्यान एक दिवसाचा प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांना एक दिवसाचे तिकीट मिळणार नाही. त्यामुळे त्यांना मासिक पास घ्यावा लागेल किंवा लोकल प्रवासाला मुकावे लागेल, असे चित्र आहे.

 

– लशीचे दोन डोस घेतलेले आणि दुसऱ्या डोसनंतर १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झालेले नागरिक लोकल प्रवासासाठी पात्र.

– रेल्वे स्थानकात महापालिकेच्या ‘हेल्पडेस्क’वरील कर्मचाऱ्यांना लसीकरण प्रमाणपत्राची प्रत सादर करावी लागणार.

– सर्टिफिकेटची पडताळणी केल्यानंतर त्यावर प्रमाणपत्राच्या प्रतिवर ‘ट्रॅव्हल पास अॅप्रुव्ह’ असा शिक्का मारण्यात येईल.

– त्याद्वारे रेल्वेच्या तिकीट खिडकीवर लोकलचा सीझन पास मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *