ओलाची ‘ई’ स्कूटर अखेर बाजारात

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १९ ऑगस्ट । गेले अनेक महिने बाजारात चर्चा सुरू असलेली ओलाची बसुप्रतीक्षित ई स्कूटर ‘ओला एस वन’ १५ ऑगस्ट रोजी बाजारात आली. शानदार डिझाइन, जास्त बूट स्पेस (सामान ठेवण्यासाठी सीटखाली मोकळी जागा), आधुनिक सुविधा आणि चांगली रेंज देईल असा कंपनीचा दावा आहे. ‘एस वन’ आणि ‘एस वन प्रो’ या दोन प्रकारांत ही स्कूटर उपलब्ध असणार आहे.

‘एस वन’ ची किंमत ९९,९९९ रुपये (एक्स शोरूम) आहे, तर ‘एस वन प्रो’ची किंमत १,२९,९९९ रुपये आहे. पण महाराष्ट्र शासनाने नुकतेचे ई धोरण जाहीर केले आहे. त्यानुसार सबसीडी मिळून अजून कमी किमतीत ती खरेदी करता येणार आहे.

ओला एस १ इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री ८ सप्टेंबरपासून सुरू होईल आणि डिलिव्हरीला ऑक्टोबरमध्ये सुरुवात होईल, असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. एखाद्या दमदार स्मार्टफोनप्रमाणे सर्व सुविधा या स्कूटरमध्ये बघायला मिळतात. यामध्ये तुम्हाला कॉलिंग आणि यूटय़ूब व्हिडीओ स्ट्रीमिंगसोबतच कस्टमायजेशन आणि नेव्हिगेशन, प्रोफाइलिंग सुविधाही देण्यात आल्या आहेत. तीन ड्रायव्हिंग मोड्स दिले असून त्यात नॉर्मल, स्पोर्ट आणि हायपर मोडचा समावेश आहे. तसेच एकूण १० आकर्षक रंगांमध्ये ही स्कूटर उपलब्ध आहे. यामध्ये ७ इंचाचा टचस्क्रीन डिस्प्ले आणि इन-बिल्ट स्पीकरही आहेत.

३.९ किलोवॅट हवर क्षमतेची बॅटरी दिली असून, इलेक्ट्रिक मोटर ८.५ किलोवॅट पीक पॉवर जनरेट करते. कंपनीचा दावा आहे की ही बॅटरी ७५० वॅटक्षमतेच्या पोर्टेबल चार्जरद्वारे जवळपास ६ तासात पूर्ण चार्ज होते, तर कंपनीच्या सुपरचार्जरद्वारे ही बॅटरी फक्त १८ मिनिटात ५० टक्के चार्ज होऊ शकते. फक्त ३ सेकंदात ० ते ४० ची वेगमर्यादा गाठू शकते. तसेच एकदा चार्ज केल्यावर ती १८१ किमीपर्यंत धावू शकते, तर सर्वाधिक वेग हा ११५ किलोमीटर पर हावर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *