औरंगाबाद-मुंबई दीड तासांत शक्य; हायस्पीड रेल्वेचा असा राहणार मार्ग

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १९ ऑगस्ट । अवघ्या दीड तासात औरंगाबादहून मुंबई गाठता येणार आहे. नागपूर-मुंबई हायस्पीड रेल्वे प्रकल्पांतर्गत (एमएनएचएसआर) हा प्रवास शक्य होणार आहे. त्यामुळे औरंगाबाद, मुंबईहून अहमदाबाद, दिल्ली आणि हैदराबादशी जोडले जाणार आहे. समृद्धी महामार्गालगत हा इलेव्हेटेड हायस्पीड कॉरिडॉर तयार केला जाणार असून या प्रकल्पासाठी रूंदी १२.५ मीटर असणार आहे. प्रकल्पासाठी जिल्ह्यात १६७.९६ हेक्टर जागा संपादित करावी लागणार आहे. औरंगाबाद रेल्वेस्थानकाजवळ हायस्पीड रेल्वेचे नवीन स्थानकही बांधले जाणार असल्याची माहिती मुंबई-नागपूर हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी येथे दिली.

शहरालगत सध्या सोलापूर-धुळे महामार्गाचे काम सुरू आहे. याशिवाय नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचेही काम सुरू आहे. देशात मुंबई-अहमदाबाद दरम्यान बुलेट ट्रेनची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. सध्या त्याचे काम सुरू आहे. याशिवाय मुंबई-नागपूर हायस्पीड रेल्वेचीही घोषणा करण्यात आली होती. मुंबई-नागपूर ७२९ किलोमीटर हायस्पीड रेल्वेच्या प्रकल्पासाठी डीपीआर (विकास आराखडा) तयार करण्याचे काम सुरू आहे. यासाठी ‘एमएनएचएसआर’ प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांकडून ज्या जिल्ह्यांतून मार्गासाठी भूसंपादन केले जात आहे. त्या भागातील नागरिकांशी चर्चा करण्याचे काम सुरू आहे.

बुधवारी प्रकल्पाचे अधिकारी सुनील शर्मा, राहुल रंजन, निवासी जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे यांच्या उपस्थितीत रूक्मिणी सभागृहात बैठक झाली. बैठकीनंतर शर्मा यांनी पत्रकारांशी चर्चा करताना सांगितले की, हायस्पीड रेल्वेच्या प्रकल्पासाठी नागपूर ते मुंबई दरम्यान एकूण १२४५.६१ हेक्टर जमीन संपादित करावी लागणार आहे. औरंगाबादला १६७.६९ हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. हे भूसंपादन वळणारा भाग सरळ करण्यासाठी केले जात आहे. या रेल्वेचा कॉरिडॉर समृद्धी महामार्गापासून दहा मीटर उंचीवर राहील. जमिनीपासून १७.५ मीटर उंच असेल तर, रूंदी १२.५ मीटर असेल. याला दोन ट्रॅक असतील. नागपूर ते मुंबई असे ७२९ किलोमीटर अंतर साडेतीन तासांत पार होईल. औरंगाबादहून दीड ते पाऊणे दोन तास लागतील.

मुंबई, शहापूर, घोटी बुद्रुक, नाशिक, शिर्डी, औरंगाबाद, जालना, मेहकर, मालेगाव, कारंजा लाड, पुलगाव, वर्धा, खापरी, अंजनी असा हा ७२९ किलोमीटरचा मार्ग आहे. यात मुंबई शहरांमध्येच रेल्वे स्थानक उभारण्यात येणार आहे.

औरंगाबादला अद्ययावत स्थानक

हायस्पीड रेल्वेसाठी औरंगाबाद रेल्वेस्थानकाजवळ नवे स्थानक उभारले जाणार आहे. त्याचा फलाट जमिनीपासून १८ मीटर उंचीवर असेल. तळमजल्यासह दोन मजली इमारत उभी केली जाणार असून सर्वांत वरच्या मजल्यावर रेल्वे फलाट असेल. याठिकाणी प्लाझा, पार्किंग आणि इतर सुविधाही देण्यात येणार आहे.

औरंगाबाद तालुक्यात हायस्पीड रेल्वेसाठी औरंगाबादमधील २३ गावांमधील ६२.९४ हेक्टर जागा संपादित होईल. गंगापूर तालुक्यातील ११ गावांमधील ३७.१० हेक्टर, वैजापूर तालुक्यात १५ गावांमधील ६७.९० हेक्टर जागा संपादित केली जाईल. यात एकूण ४९ गावांमधून हा मार्ग जाईल. या १६७.९६ हेक्टर जागेमधील खाजगी जमीन ७३.७३ हेक्टर आहे तर, सरकारी जमीन ९४.२२ हेक्टर आहे. भूखंड बाधितांची संख्या ६११ असून यात ४१० खासगी तर, २०१ सरकारी भूखंड असतील.

हायस्पीड रेल्वेची ताशी ३५० किलोमीटरची गती असणार आहे. यामुळे वळणदार रस्त्याच्या ठिकाणी सरळ रेल्वे मार्ग तयार करावा लागत आहे. औरंगाबादला बेंदेवाडीपर्यंत समृद्धी मार्गासोबत हायस्पीड कॉरिडॉर ठेवण्यात आला आहे. बेंदेवाडीहून सातारा, बाळापूर, देवळाई, तिसगाव या मार्गाने हे मार्ग वैजापूरला समृद्धी महामार्गाशी मिळतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *