महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २० ऑगस्ट । गणेशोत्सव म्हटलं की, गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष आणि ढोल-ताशांचा गजर ठरलेलाच. पण कोरोनाने ही परिस्थिती गेल्या वर्षीपासून बदलली आणि मुंबईतील ढोल-ताशा पथकांचा आर्थिक डोलारा कोसळायला वेळ लागला नाही. आता यातून सुटका व्हावी यासाठी यंदा तरी मुंबई आणि पुण्यात गणेशोत्सवासाठी ढोल-ताशा पथकांना परवानगी द्यावी, अशी आग्रही मागणी मुंबईतील डबेवाल्यांच्या ढोल ताशा पथकांतर्फे करण्यात आली आहे. या मागणीकरिता लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती ही मुंबई डबेवाला असोसिएशनतर्फे देण्यात आली आहे.
मुंबईसह राज्यात दरवर्षी मोठय़ा आनंदात आणि उत्साहात गणरायाचे आगमन आणि विसर्जन मिरवणूक काढली जाते. ढोलताशांच्या गजरात गुलाल उधळीत बाप्पांचे स्वागत आणि निरोप देण्यात येतो. पण कोरोनामुळे ही परिस्थिती बदलली आहे. गेल्या वर्षीपासून अत्यंत साधेपणाने हा उत्सव साजरा करण्यात येत असल्याने मुंबईसह पुण्यातील ढोल ताशा पथकांना त्याचा जबरदस्त फटका बसला आहे. या ढोलताशा पथकांमध्ये मुंबईच्या डबेवाल्यांकडून चालविण्यात येणाऱया 20 ते 25 ढोल ताशा पथकांचादेखील समावेश आहे. दरवर्षी ही ढोल ताशा पथके मुंबई आणि पुण्यात गणपती आगमन आणि विसर्जन मिरवणुकीत आपली कला सादर करतात. मात्र कोरोनामुळे गेल्या वर्षींपासून नियमांच्या चौकटीत राहून साधेपणाने उत्सव साजरा करण्याची सूचना राज्य सरकारने केल्यामुळे त्याचा फटका या ढोल ताशा पथकांना बसला आहे. पण सध्या मुंबईसह पुण्यात कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात येत असल्याने यंदाच्या गणेशोत्सवासाठी ढोल ताशा पथकांना परवानगी द्यावी, अशी मागणी मुंबई डबेवाला असोसिएशनच्यावतीने करण्यात आली आहे.