महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २० ऑगस्ट । ज्येष्ठ गिर्यारोहक शरद कुलकर्णी यांनी वयाच्या 59 व्या वर्षी रशियातील सर्वात उंच माऊंट एल्ब्रुस शिखर सर केला आहे. या वयात शिखर सर करणारे शरद कुलकर्णी हे पहिले हिंदुस्थानी ठरले आहेत.12 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता हिमवादळाला सामोरे जात शरद कुलकर्णी यांनी माऊंट एल्ब्रुसवर यशस्वी चढाई केली. याआधीही 2020 साली दक्षिण अमेरिकेतील माऊंट आकांकागुआ शिखर सर करणारे ते पहिले वयस्कर हिंदुस्थानी ठरले होते. 2014 साली एल्ब्रुस शिखरावरून अतिशय खराब हवामानामुळे मोहीम अर्धवट सोडून त्यांना मायदेशी परतावे लागले होते, पण या वेळी अतिशय जिद्दीने खराब वातावरणाला सामोरे जात त्यांनी मोहीम फत्ते केली.
याआधी कुलकर्णी यांनी माऊंट एव्हरेस्ट, दक्षिण आफ्रिकेतील किलिमांजारो, ऑस्टेलियातील माऊंट कोझियेस्को, मेरा पीक, लोबूचे पीक, हिंदुस्थानातील स्टोककांग्री, माऊंट हनुमान तिब्बा, कश्मीरमधील सनसेट पीक अशी अनेक शिखरे सर केली आहेत.
दिवंगत पत्नीला मोहीम समर्पित
शरद कुलकर्णी यांनी माऊंट एल्ब्रुस मोहीम दिवंगत पत्नी अंजली कुलकर्णी यांना समर्पित केली. त्यांचे 2019 साली एव्हरेस्ट मोहिमेदरम्यान निधन झाले होते. उतारवयात इतर लोक निवृत्तीची भाषा करत असताना या वयात उंच शिखर सर करून छंद जोपासत शरद कुलकर्णी यांनी इतरांसमोर आदर्श ठेवला आहे.