युनेस्कोसाठी नामांकन ; माथेरानच्या मिनी ट्रेनची आंतरराष्ट्रीय चढाई

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २० ऑगस्ट । मुंबईसह महाराष्ट्राचे पर्यटन स्थळ म्हणून गौरविलेले ‘मिनी ट्रेनचे माथेरान’ आता आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्यास सज्ज झाले आहे. ‘युनेस्को ग्रीस मेलिना मर्कोरी आंतरराष्ट्रीय पारितोषिक २०२१’साठी देशाकडून माथेरानचे नामांकन पाठवण्यात आले आहे. यामुळे माथेरानच्या मिनी ट्रेनची ‘झुकझुक’ आता आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील ऐकू येणार आहे.

२४ जून रोजी मध्य रेल्वेने इंडियन नॅशनल कमिशन फॉर कोऑपरेशन विथ युनेस्को यांच्या माध्यमाने मिनी ट्रेनचा अर्ज दाखल केला. ९ ऑगस्ट रोजी माथेरानचे नामांकन मंजूर केल्याचे पत्र युनेस्कोकडून केंद्र सरकारला प्राप्त झाले. १३ ऑगस्ट रोजी मध्य रेल्वेच्या पर्यावरण आणि गृहव्यवस्थापक विभागाने माथेरान नगरपरिषदेकडे पत्रव्यवहार करून अंतिम टप्प्यातील माहिती केंद्र सरकारकडे पाठवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. अंतिम फेरीसाठी माथेरानमधील सांस्कृतिक जीवन, जैवविविधता, मिनी ट्रेनमुळे आदिवासी जीवनावर होणारे परिणाम, माथेरान बायोगॅस प्रकल्प, वीज आणि जंगलसंवर्धनाचे धोरण, स्थानिकांचे जीवनमान, स्थानिक परंपरा आणि उत्सवांबाबत माहिती मागवण्यात आली आहे.

नेरळ ते माथेरान या मार्गावरील माथेरानच्या मिनी ट्रेनची परिचालन आणि देखभाल मध्य रेल्वेकडून करण्यात येते. सध्या अमन लॉज ते माथेरान या दरम्यान मिनी ट्रेन धावत आहे. वाहनविरहित पर्यटन स्थळ आणि बायोगॅस प्रकल्पांसह आवश्यक सर्व माहिती नगरपरिषदेने मध्य रेल्वेकडे सुपूर्द केली आहे. पुरस्कारासाठी आवश्यक सर्व माहिती रेल्वे प्रशासनाला पुरवण्यात आली आहे. युनेस्को आंतरराष्ट्रीय पुरस्कार नामांकनामध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणे ही प्रत्येक माथेरानवासीयांसाठी गौरवाची बाब असल्याचे नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी सांगितले.

दर दोन वर्षांनी हा पुरस्कार देण्यात येतो. पुरस्कारासाठी दोन फेऱ्या असतात. पहिल्या फेरीत माथेरान विजयी झाले आहे. अंतिम फेरीतील निकाल ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये लागण्याची शक्यता आहे. माथेरानची मिनी ट्रेन आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचणे ही मोठी बाब असून, मिनी ट्रेनचे जतन, संरक्षण करण्यासाठी मध्य रेल्वे नेहमी तत्पर आहे. – शलभ गोयल, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, मध्य रेल्वे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *