‘या’ पदार्थांचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती होईल मजबूत!

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २० ऑगस्ट । व्हिटॅमिन सी महत्वाचे का आहे?
तुम्ही जर व्हिटॅमिन-सी युक्त असलेल्या पदार्थांचे आहारात नियमितपणे सेवन केले तर तुमच्या शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. तसेच शरीरातील मेटाबॉलिज्मची (चयापचय) क्रिया वाढण्यास मदत होते. यामुळे तुमच्या शरीराला अनेक विषाणूजन्य आजारांपासून संरक्षण मिळते.

संत्री
दररोज तुम्ही सकाळी किंवा दिवसभरात संत्र्याचे सेवन करावे. कारण संत्र्यामध्ये व्हिटॅमिन-सी तसेच फायबर, थायमिन आणि पोटॅशियम हे घटक अधिक प्रमाणात असतात. तसेच यात ग्लायसेमिक इंडेक्स देखील कमी असल्याने मधुमेह आणि लठ्ठपणावर ग्रस्त असलेल्या लोकांसाठी संत्रे खूप फायदेशीर ठरू शकते.

लिंबू
लिंबामध्ये व्हिटॅमिन-सी आणि साइट्रिक एसिड असल्याने तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. याचबरोबर त्यात असलेले सायट्रिक एसिड शरीरातील चरबी कमी करण्यास तसेच वजन कमी होण्यास देखील मदत करते. खरं तर रोज सकाळी तुम्ही रिकाम्या पोटी लिंबाचा रस व मध हे कोमट पाण्यात नीट मिसळून प्यायल्याने तुमचे शरीर निरोगी राहण्यास मदत होते.

आवळा
आवळामध्ये व्हिटॅमिन-सी सोबत लोह, फोलेट आणि अँटिऑक्सिडंट्सची चांगली मात्रा असते. आयुर्वेदानुसार आवळ्याच्या सेवनाने तुमच्या शरीरातील वात, पित्त आणि कफ या तीन प्रकारच्या दोषांचे नियंत्रण होते.

पपई
पपई हे फळ त्याच्या नैसर्गिक रेचक गुणधर्मांसाठी सर्वत्र ओळखले जाते. पपईचे तुम्ही नियमित सेवन केल्याने तुमची पचन शक्ती मजबूत होते. यासोबतच पपईला व्हिटॅमिन-सीचा उत्तम स्रोत देखील मानला जातो. पपईमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स शरीराला डिटॉक्सिफाय करण्यास मदत करतात. याशिवाय पपई खाल्ल्याने पोटाशी संबंधित आजार दूर राहतात.

पेरू
पेरु हे व्हिटॅमिन-सी समृद्ध असलेलं फळ आहे. या व्यतिरिक्त पेरूमध्ये फायबर आणि पोटॅशियम सारखे घटक आहेत. यामुळे पेरूचे सेवन केल्याने रोगप्रतिकार शक्ती मजबूत होतेच याशिवाय शरीराला अनेक आजारांपासून संरक्षण देखील मिळते. तुम्ही नेहमी तुमच्या आहारात पेरूचं सेवन केलं तर ते तुमचं हृदय निरोगी ठेवेल. याचबरोबर शरीरातील साखरेचे प्रमाण देखील नियंत्रित राहील.

शिमला मिरची
तुम्ही तुमच्या आहारात शिमला मिरचीचा आवर्जून समावेश करावा. यामध्ये व्हिटॅमिन-सी, ई, ए आणि फायबर आहे. तसेच शिमला मिरची मध्ये फोलेट आणि पोटॅशियम ही पोषक तत्त्वे असल्याने यातील फोलेट हे तुमच्या शरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत करते आणि पचनशक्ती वाढवते. तसेच रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *