महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २० ऑगस्ट । शहराबरोबर आता ग्रामीण भागामध्येही सायबर चोरट्यांनी डाव टाकण्यास सुरूवात केली आहे. त्यानुसार डिमार्टच्या 20 व्या वर्धापन दिनानिमित्त ऑफरच्या नावाखाली ग्रामीण भागातील नागरिकांना पाच हजारांचे आमिष दाखवून बँकखाते मोकळे करण्याचा प्रयत्न सायबर चोरट्यांकडून केला जात आहे. त्यामुळे नागरिकांनो सावधान पाच हजार रूपयांच्या आमिषाला भुलून बँकखात्याची गोपनीय माहिती शेअर केल्यास तुमची फसवणूक होउ शकते. त्यामुळे आर्थिंक फसवणूक टाळण्यासाठी नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन पुणे ग्रामीण पोलिसांनी केले आहे.
जिल्ह्यातील विविध भागात सायबर चोरट्यांकडून नामी क्ऌप्ती वापरून डिमार्टच्या नावाचा वापर करण्यात येत आहे. त्यानुसार लिंक तयार करण्यात आली असून 20 व्या वर्धापनदिनाचे निमित्त सांगून आर्थिक फसवणूकीचे जाळे टाकले जात आहे. त्याशिवाय 5 हजारांचे बक्षिस मिळविण्यासाठी संबंधित बनावट लिंक 20 मित्रांना शेअर करण्याचे सांगितले जात आहे. पैशांच्या आमिषाला भुरळून अनेकांकडून डिमार्ट 20 वा वर्धापन दिनानिमित्त ग्राहकांना ऑफर, मोफत भेटवस्तू देण्याचा दावा केला जात आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 6 नागरिकांची अशाचपद्धतीने फसवणूक करण्यात आली आहे. ग्रामीण भागासह शहरातील अनेकांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये ही बनावट लिंक व्हायरल झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी काळजी घेण्याचे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी केले आहे.