महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २२ ऑगस्ट । केंद्रात मंत्रिपद मिळाल्यामुळे सर्व राज्य मंत्र्यांची जन आशीर्वाद यात्रा (Jan Ashirwad Yatra) मोठ्या धुमधडाक्यात काढण्यात आली आहे. केंद्रीय राज्यमंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांचीही मुंबई जन आशीर्वाद यात्रा काढण्यात आली. पण, तिसऱ्या दिवसांपर्यंत निघालेल्या यात्रेमुळे 42 गुन्हे दाखल झाल्याची बाबसमोर आली आहे.
राज्यात कोरोनाची परिस्थिती आटोक्यात असली तरी सार्वजनिक ठिकाणी सभा आणि रॅली काढण्यास राजकीय पक्षांना मनाई आहे. असं असतानाही भाजपकडून जन आशीर्वाद यात्रेचा घाट घालण्यात आला आणि सर्व नियम मोडून यात्रा वाजत गाजत काढण्यात आली. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांची यात्रा मुंबईतच काढण्यात आली होती. तीन दिवसांच्या यात्रेत राणेंनी मुंबई पिंजून काढली.
पण, तिसऱ्या दिवशी निघालेल्या जन आशीर्वाद यात्रेत वसई, विरार आणि भायंदर शहरात 6 गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या यात्रेला पोलिसांनी कोणतीही परवानगी दिली नव्हती, तरीही यात्रा काढण्यात आली होती. त्यामुळे कोविड नियमांची उल्लंघन केल्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
मानिकपुर पोलीस स्टेशन, तुलिंज, काशिमिरा, वालीव, वसई आणि विरारमधील पोलीस स्टेशनमध्ये भादवी कलमनुसार 341, 269 ,270 आणि सेक्शन 2 ,3 ,4 सहित कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी हे 6 गुन्हे दाखल झाले आहे.
स्थानिक भाजप नेते आणि कार्यक्रम आयोजकांवरही गुन्हे दाखल झाले आहे. याआधी मुंबई काढलेल्या यात्रेमुळे मुंबईतील वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये आधीच 36 गुन्हे दाखल आहे. त्यामुळे एकूण गुन्ह्यांची संख्याही 42 वर पोहोचली आहे.
परंतु, दुसरीकडे गुन्हे दाखल झाल्यामुळे भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये वाद पेटला आहे. सत्ताधारी मंत्र्यांच्या सभांना गर्दी होत असेल तर मग आमच्यावरच गुन्हे का दाखल करतात, असा सवाल भाजप नेत्यांनी उपस्थितीत केला आहे. तर जन आशीर्वाद यात्रा नसून कोरोनाचा प्रसार करणारी यात्रा आहे, अशी टीका शिवसेनेच्या नेत्यांनी केली आहे.