भारतीय लष्करात पहिल्यांदा महिला अधिकाऱ्यांची कर्नलपदी बढती

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २४ ऑगस्ट । भारतीय लष्कराच्या निवड मंडळाने पाच महिला अधिकाऱ्यांना त्यांनी लष्करात 26 वर्ष मानाची सेवा पूर्ण केल्यानंतर त्यांना कर्नल (टाइम स्केल) पदावर बढती देण्याचा निर्णय घेतला आहे. सिग्नल, इलेक्ट्रॉनिक्स आणि मेकॅनिकल अभियंता (ईएमई) या तुकड्यांमध्ये कार्यरत महिला अधिकाऱ्यांना कर्नल (टाइम स्केल) श्रेणी मंजूर होण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी, केवळ लष्करी वैद्यकीय सेवा तुकडी, न्यायाधीश महाधिवक्ता आणि लष्कराची शिक्षण विषयक तुकडी या तुकड्यांमध्ये सेवा बजावणाऱ्या महिला अधिकाऱ्यांनाच कर्नल पदावर बढती दिली जात होती.

भारतीय लष्कराने बढती देण्यासाठी अधिक शाखांच्या विस्ताराचा निर्णय घेणे हे महिला अधिकाऱ्यांच्या व्यावसायिक संधींमध्ये वाढ होण्याकडे पाऊल आहे. भारतीय लष्कराच्या बहुतांश शाखांमधील महिला अधिकाऱ्यांना स्थायी कमिशन देण्याच्या यापूर्वी घेतलेल्या निर्णयासोबत, आताच्या या नव्या निर्णयाने, भारतीय लष्कराचा लिंग-निरपेक्ष लष्कर घडविण्याचा दृष्टीकोन स्पष्ट होत आहे.

कर्नल (टाइम स्केल) पदावर बढतीसाठी निवड झालेल्या महिला अधिकाऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. सिग्नल तुकडीतील लेफ्ट.कर्नल संगीता सरदाना, ईएमई तुकडीतील लेफ्ट.कर्नल सोनिया आनंद आणि लेफ्ट.कर्नल नवनीत दुग्गल, कॉर्प अभियंता तुकडीतील लेफ्ट. कर्नल रीनु खन्ना आणि लेफ्ट.कर्नल रिचा सागर यांची निवड करण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयानं एनडीए म्हणजेच, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीची दारं आता मुलींसाठीही खुली केली. एनडीएची प्रवेश परीक्षा मुलींनाही देता येणार आहे. या निर्णयानं सर्वोच्च न्यायालयानं देशभरातील मुलींना मोठा दिलासा मिळाला. 5 सप्टेंबरला एनडीएची प्रवेश परीक्षा आहे आणि पहिल्यांदाच मुलींनाही ही परीक्षा देता येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *