महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २४ ऑगस्ट । कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शासनाने घातलेल्या निर्बंधातून काही प्रमाणात जालना जिल्ह्याला सूट मिळाली असली तरी सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही याची काळजी घेत दररोज अडीच हजारापर्यंत कोरोनाच्या चाचण्या होतील, यादृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश आरोग्य व कुटूंबकल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. तसेच मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. जालना जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना टोपे बोलत होते.
या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, जिल्हा पोलीस अधिक्षक विनायक देशमुख आदी उपस्थित होते. पालकमंत्री टोपे म्हणाले, जालना जिल्ह्यामध्ये आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या कमी होणार नाही, यादृष्टीने नियोजन करत चाचण्याची संख्या दररोज अडीच हजारापर्यंत वाढविण्याबरोबरच लोरिस्क व हायरिस्क सहवासितांचा अचूकपणे शोध घेऊन त्यांच्या चाचण्या करण्यात याव्यात. जालना जिल्ह्याचा कोरोनाचा पॉझिटीव्हीटी दर सध्या कमी असला तरी हा दर भविष्यात वाढू नये, यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे निर्देश देत सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही याची काळजी घेण्यात यावी, असे ते म्हणाले.