अटकेनंतर नारायण राणेंची पहिली प्रतिक्रिया; त्यांना जे करायचं आहे ते करू दे, मला जे करायचं आहे ते मी करेन,

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २४ ऑगस्ट । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेलं विधान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना भोवलं आहे. नारायण राणे यांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. अटकेनंतर नारायण राणे यांनी टाइम्स नाऊशी बोलताना पहिली प्रतिक्रिया दिलीय. यामध्ये त्यांनी अटक झाली तेव्हा काय काय घडलं हे सांगताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दलही वक्तव्य केलं आहे. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये नारायण राणे यांनी नक्की काय घडलं याबद्दल माहिती दिली आहे.

अटक झाल्यानंतर या वृत्तवाहिनीला व्हि़डीओ कॉलच्या माध्यमातून प्रतिक्रिया देताना नारायण राणेंना उद्धव ठाकरेंना काय सांगाल असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर राणेंनी, “उद्धव ठाकरेंना जे करायचं आहे ते करू दे, मला जे करायचं आहे ते मी करेन,” असं उत्तर दिलं. मुलाखत घेणाऱ्या माहिलेने “उद्धव ठाकरेजी को क्या कहेंगे?”, असं विचारलं असता राणेंनी “कुछ नही कहुंगा…” असं म्हणत उद्धव ठाकरेंना जे करायचं आहे ते करू दे, मला जे करायचं आहे ते मी करेन, असं उत्तर दिलं. “ते कायम थोडी मुख्यमंत्री राहणार आहेत, अशाप्रकारे ते कायद्याचा गैरवापर करणार असतील तर आम्ही सुद्धा राजकारणामध्ये आहोत,” असं सूचक वक्तव्य राणेंनी केलं.

अटक झाली तेव्हा नक्की काय घडलं याबद्दलही नारायण राणेंनी यावेळी भाष्य केलं आहे. “गोळवली येथील गोळवलकर गुरुजी स्मृती प्रकल्प येथे मी दुपारी तीन सव्वा तीनच्या सुमारास जेवत असतानाच अचानक तिथे डीसीपी आले आणि तुम्हाला अटक करण्यात येत आहे असं मला सांगितलं. मी त्यांना नोटीस दाखवा असं म्हटलं. तर त्यांच्याकडे नोटीस वगैरे नव्हती. त्यांनी जबरदस्तीने मला अटक करुन इथे संगमेश्वर पोलीस स्थानकामध्ये आणलं. त्यानंतर ते एका रुममध्ये गेले आणि दोन तास बाहेर आले नाहीत. मला त्यांचा हेतू चांगला वाटला नाही. माझ्या जीवाला धोका असल्याप्रमाणे त्याच्या हलचाली होत्या. नंतर तिथे अनेक अधिकारी आले. आता मला कोकणातील महाड येथे नेलं जात आहे,” असं राणे म्हणाले.

राणे यांना तुम्ही ते वादग्रस्त वक्तव्य करुन चूक केली असं वाटतंय का?, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर राणेंनी, मी कानाखाली मारेल असं म्हणालो नव्हतो. हा कितवा १५ ऑगस्ट आहे हे मुख्यमंत्र्यांना माहिती नव्हतं हे चुकीचं असल्याचं म्हटलं. त्यांनी सेक्रेट्रीला विचारावं हे चूक असल्याचं मी म्हटलं होतं. आधीच त्यांनी वाचून यायला हवं होतं असं मत मी मांडलेल. तसेच मी तिथे असतो तर कानाखाली मारली असती असं म्हणालो होतो, असं राणे यांनी स्पष्ट केलं.

अटकेपूर्वी राणेंनी रत्नागिरी सत्र न्यायालयामध्ये अटकपूर्व जामीन अर्ज केला होता. मात्र हा अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तिथेही योग्य ती प्रक्रिया पार पाडून याचिका करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने नारायण राणे यांच्या वकिलांना दिले होते. त्यामुळे तातडीने सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला. त्यानंतर नारायण राणेंच्या अटकेचा मार्ग मोकळा झाल्याने पोलिसांनी त्यांना अटक केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *