महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २५ ऑगस्ट । केंद्रीय मंत्री नारायण राणे लवकरच महाराष्ट्रातील अर्धवट राहिलेली त्यांची ‘जन आशीर्वाद यात्रा’ पुन्हा सुरू करतील. राणे यांच्या दौऱ्याचा मार्ग पूर्वी होता तोच असेल आणि त्यांची यात्रा पुन्हा सुरू होण्याची तारीख लवकरच जाहीर केली जाईल, असं राजन तेली यांनी म्हटलंय. तसेच गेल्या दोन दिवसातील घडामोडींनंतर आज नारायण राणे पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे, असं भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी म्हटलंय.
नारायण राणेंनी १९ ऑगस्टला मुंबईतून जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात केली होती. या यात्रेचा समारोप सिंधुदुर्गमध्ये होणार होता. रायगडमध्ये नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना कानाखाली लावण्याचं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याने शिवसेना-भाजपा आमने-सामने आले आणि राज्यातील वातावरण चांगलेच तापले होते. नारायण राणेंचा अटकपूर्वी जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्यांना रत्नागिरी पोलिसांनी अटक करून, महाडच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते. या ठिकाणी सुनावणीवेळी त्यांच्या जामीनासाठी राणेंच्या वकीलाकडून जोरदार युक्तीवाद करण्याता आला. तर, पोलिसांकडून सात दिवसांसाठी पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती. रात्री उशीरापर्यंत चाललेल्या या सुनावणीत नारायण राणेंना जामीन मंजूर करण्यात आला होता.