कास पठारावर दोन वर्षांनंतर पर्यटकांची पावले; आजपासून पठार खुले

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २५ ऑगस्ट । जागतिक वारसास्थळ म्हणून गौरवलेल्या कास पठारावरील रंगोत्सव सुरू झाला असून यंदा हंगामाला चांगलाच रंग चढणार आहे. हे पठार आजपासून पर्यटकांसाठी खुले होत आहे. सप्टेंबरच्या दुसर्‍या आठवड्यात या पठारावर फुलांचा गालिचा पाहायला मिळणार असून देश-विदेशातील पर्यटकांची पावले दोन वर्षांनंतर या पठारावर पडणार आहेत.

कास पठार रंगीबेरंगी फुलांनी बहरू लागले असून पठारासह डोंगररांगा हिरवळल्या आहेत. पंधरवड्यानंतर पठारावरील फुलोत्सवाला बहर येणार आहे. गेल्यावर्षी कोरोनामुळे या पठारावर पर्यटकांची पावले पडलीच नाहीत. संपूर्ण हंगामात कासवर पर्यटकांना बंदी होती. त्याच्या आदल्या वर्षी पावसामुळे हंगाम पूर्णपणे बहरलेला होता. मात्र पावसामुळे पर्यटकांच्या भेटीवर मर्यादा राहिली होती. 2018 च्या तुलनेत 2019 च्या हंगामात पर्यटकांची संख्या कमी राहिली होती. त्यामुळे यंदा हे पठार दोन वर्षांची पर्यटकांची फुलोत्सवाची आस पूर्ण करण्यासाठी सज्ज झाले आहे. ‘हिरवे हिरवे गार गालिचे, हरित तृणांच्या मखमालीचे’ असं हे देखणं रूप सध्या पाहायला मिळत असून हिरव्यागार मखमली गालिच्याचा रंग आठ-पंधरा दिवसांनी बदलताना दिसत असला तरी सध्या रंगीबेरंगी फुले तुरळकच दिसत आहेत. पांढरा शुभ्र, लाल, निळा, जांभळा, पिवळा, अबोली अशा कितीतरी रंगांच्या छटांचे हे पुष्पवैभव सप्टेंबरच्या दुसर्‍या आठवड्यात डोळ्यांचे पारणे फेडणार आहे.

या पुष्प पठारावर क्षणात सूर्यकिरणांतील इंद्रधनुषी छटा तर क्षणात बोचरा वारा, क्षणार्धात दाट धुके, रिमझिम पावसाच्या सरी अशा वातावरणातील बदलांचाही हवाहवासा क्षण प्रत्येकालाच मोहात टाकणारा असतो. गर्द धुके, हिरव्यागार विविध रंगांच्या वनस्पतीमुळे आणि नयनरम्य फुलांमुळे कास पुष्प पठार परिसर जणू धरतीवरचा स्वर्ग असल्याचा भास येथे येणार्‍या प्रत्येकालाच होतो. हा नजराणा गेल्यावर्षी कोरोनामुळे पर्यटकांसाठी उलगडलाच नाही. संपूर्ण हंगाम काळात या पठारावर पर्यटकांना बंदी होती. त्यामुळे देश-विदेशातील पर्यटकांना येथे येता आले नाही. आता मात्र कोरोनाचा जोर ओसरला असून पर्यटन खुलले आहे. त्यामुळे हे पठार पर्यटकांसाठी बुधवार, (दि. 25)पासून खुले होत आहे. सध्या पठारावर तुरळक स्वरूपात फुले आली असून सप्टेंबरच्या दुसर्‍या आठवड्यात गालिचा फुलणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *