महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २५ ऑगस्ट । देशातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी यातून लवकर सुटका होणार नसल्याचे संकेत जागितक आरोग्य संघटनेच्या प्रमुख वैज्ञानिक डॉक्टर सौम्या स्वामीनाथन यांनी दिले आहेत. सौम्या स्वामीनाथन यांनी म्हटलं आहे की, भारतात कोरोना महामारी ही Endemic Stage म्हणजेच स्थानिक टप्प्यात पोहोचण्याच्या मार्गावर आहे. या टप्प्यात कमी आणि सौम्य स्तरावर संसर्ग होतो.
डॉक्टर सौम्या यांनी म्हटलं की, जेव्हा लोक कोणत्याही विषाणूसह रहायला शिकतात तेव्हा स्थानिक स्थिती (Endemic Stage) होते. आशा आहे की, जागितक आरोग्य संघटना भारतातील कोव्हॅक्सिनला त्यांच्या अधिकृत लशींमध्ये समाविष्ट करण्यासाठीची मंजुरी देण्यावर सहमत होईल. सप्टेंबरच्या मध्यापर्यंत कोव्हॅक्सिनला मंजुरी मिळू शकेल असंही त्यांनी सांगितलं.
भारताची भौगोलिक विविधता, वेगवेगळ्या भागातील लोकसंख्या आणि लोकांमध्ये कोरोनाशी लढण्याची प्रतिकारक क्षमता पाहता असं म्हणता येईल की, भारतात कोरोना बराच काळ राहील. येत्या काही वर्षांमध्ये कोरोनाच्या परिस्थितीत चढ उतार बघायला मिळतील असंही सौम्या स्वामिनाथन यांनी म्हटलं.