महाराष्ट्र २४ ; मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजकारण आणि समाजकारणातल्या नव्या भूमिकेचे संकेत दिले आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदम्यानही त्यांनी सक्रिय निवडणुका आता लढणार नाही असं वक्तव्य केलं होतं. आता पुन्हा एकदा त्यांनी आपल्या बदलत्या आणि नव्या भूमिकेचे संकेत दिले आहेत. ते म्हणाले, वयाच्या या टप्प्यावर व्हिजन सांगणं योग्य नाही. तर आता तरुणांना व्हिजन द्यायचं आणि ते काय करतात ते बघायचं. त्यांच्या कामात फार काही हस्तक्षेप करायचा नाही. कारण न विचारता सतत सांगत गेलं की मान राहात नाही असंही त्यांनी सांगितलं.
पवार म्हणाले, महाराष्ट्र 60 वर्षांचा झालाय तर मी 80 वर्षांचा झालोय. आता या वयात नवं व्हिजन काय पाहणार. मी आता हळूहळू काम थांबवतोय. आता तरुणांना व्हिजन देण्याचं काम मी करतोय. कारण नवी पिढी पुढे गेली पाहिजे त्यांच्या हातात कारभार दिला पाहिजे. मी आता तेच करतोय. तरुणांना व्हिजन देत त्यांचं काम मी पाहात असतो. त्यांनी विचारलं तरच सल्ला देतो.
कारण न विचारता सल्ला देणं आणि सतत कामांमध्ये हस्तक्षेप करणं हे योग्य नसतं. त्यामुळे तुमचा मान राहात नाही. असंही त्यांनी स्पष्टपणे सांगत नव्या भूमिकेचे संकेत दिले. ‘एबीपी-माझा’च्या माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन या कार्यक्रमात ते बोलत होते.
वयाच्या 80व्या वर्षीही पवार हे अजुनही अतिशय सक्रिय आहेत. सातारा पोटनिवडणुकीत त्यांनी पावसात दिलेलं भाषण प्रचंड गाजलं होतं. याही वयात ते शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांचं गाऱ्हाणं ऐकून घेत असल्याने त्याबद्दल सर्वच क्षेत्रातून चर्चा केली जात असते. महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यात त्यांनी सर्वात महत्त्वाची भूमिका बजावली होती. या त्यांच्या भूमिकेमुळेच महाराष्ट्रातल्या राजकीय प्रयोगाचं सर्व श्रेय हे त्यांनाच दिलं जातं.