महाराष्ट्र २४ ; बंगळूर : नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात (सीएए) बंगळूरमध्ये आयोजित सभेत ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देण्याचा धक्कादायक प्रकार घडला. ज्या तरुणीने अशा घोषणा दिल्या; तिला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर तिची रवानगी न्यायालयीन कोठडी करण्यात आली आहे. अमुल्या असे त्या तरुणीचे नाव आहे. तिच्यावर देशद्रोहाचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे सभेच्या व्यासपीठावर ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) चे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या समोर सदर तरुणीने ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा दिल्या. ही सभा ओवेसी यांनीच आयोजित केली होती.
या घटनेनंतर अमुल्या लियोना हिला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर तिला बंगळूर कोर्टासमोर हजर करण्यात आले. कोर्टाने तिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आपल्या सभेच्या व्यासपीठावर ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा दिल्याबद्दल ओवेसी यांनी निषेध व्यक्त केला आहे.
अमुल्याने दिलेल्या ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणेचा व्हिडिओ वेगाने व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत ओवेसी व्यासपीठावरून जात असताना अमुल्या या तरुणीने हातात माइक घेतला आणि ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देण्यास सुरूवात केली. हा प्रकार लक्षात येताच ओवेसी मागे फिरले आणि त्यांनी तिला थांबविण्याचा प्रयत्न केला. ओवेसी यांच्या समर्थकांनी तिच्या हातातून माइक काढून घेण्याचा प्रयत्न केला, तरीही तिने घोषणा देण्याचे थांबविले नाही. यानंतर अमुल्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
या प्रकाराबद्दल निषेध व्यक्त करत ओवेसी यांनी म्हटले आहे की, मी घोषणा ऐकून हैराण झालो. मी तिला थांबविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिला व्यासपिठावरून बाजूला केले. असे लोक वेडे आहेत. त्यांना देशाबद्दल प्रेम नाही. असे करायचे असेल तर दुसऱ्या जागी जाऊन करावे. माझ्या सभेत असला प्रकार करु नये. मी या प्रकाराबद्दल निषेध व्यक्त करत आहे.