महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २६ ऑगस्ट । देशात कोरोनाच्या (Corona Virus) तिसऱ्या लाटेचा (Third Wave) इशारा देण्यात आला आहे. याचेच संकेत आता येऊ लागले आहेत. नुकताच केरळमध्ये ओनम साजरा झाला. त्यानंतर केरळमध्ये (Kerala) कोरोना रुग्णांचा आकडा भलताच वाढला आहे. अशातच आता तोंडावर गणेशोत्सव येत आहे. त्या आधीच देशात कोरोना रुग्णांच्या संख्येचा उद्रेक पाहायला मिळतोय. त्यातच देशात जवळपास 60 कोटीहून अधिक लसीचे डोस (Corona Vaccination) नागरिकांना देण्यात आलेत. तरीही पुन्हा एकदा देशात कोरोना रुग्णांचा आकडा वाढलेला पाहायला मिळतोय.
देशात कोरोना व्हायरसच्या रुग्णांच्या आकड्यात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मते, गुरुवारी गेल्या 24 तासांमध्ये 46 ,164 नवे रुग्ण आढळून आलेत. त्यात 607 लोकांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे सलग दुसऱ्या दिवशी कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 600 च्या वर गेली आहे. गेल्या 55 दिवसात नव्या रुग्णांचा एवढा जास्त आकडा पहिल्यांदाच वाढला आहे. त्याचवेळी 13 दिवसात पहिल्यांदा नव्या रुग्णांची संख्या 40 हजारापार ओलांडली आहे.
देशात 34,159 कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. समोर आलेल्या नव्या आकडेनुसार, देशात कोरोनाची एकूण कोरोना रुग्णांचा आकडा 3,25,58,530 वर गेला आहे.
यापैकी, बरे झालेल्या लोकांची एकूण संख्या – 3,17,88,440
अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या – 3,33,725
मृतांची संख्या 4,36,365 वर पोहोचली आहे.
यासह, गेल्या 24 तासांमध्ये अॅक्टिव्ह रुग्णांमध्ये 11,398 नं वाढ झाली आहे.
गेल्या 24 तासात देशात 80 लाख 40 हजार 407 डोस नागरिकांना देण्यात आले. आतापर्यंत 60 कोटी 38 लाख 46 हजार 475 लोकांना लसीचे डोस देण्यात आलेत. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया म्हणाले की, देशात देण्यात आलेल्या कोविड -19 लसीच्या डोसची संख्येनं बुधवारी 60 कोटींचा टप्पा पार केला.
राज्यातही कोरोनाचा पुन्हा उद्रेक
बुधवारी 24 तासांमध्ये कोरोनामुळे 216 जणांचा मृत्यू (corona death cases) झाला आहे. तर नवी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 5 हजारांच्या पुढे गेली आहे. राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडून गेल्या 24 तासांतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या प्रसिद्ध करण्यात आली आहे. बुधवारी राज्यात तब्बल 5031 नवे रुग्ण आढळून आले आहे. गेल्या काही दिवसांपासून ही रुग्ण संख्या 4 हजाराच्या घरात होती. पण, आता अचानक त्यात वाढ झाली आहे. मृत रुग्णांची संख्या वाढल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. सोमवारी ही संख्या 105 इतकी होती. बुधवारी त्यात दुपट्टीने वाढ झाली आहे. राज्यात मृत्यूदर हा 2.12 टक्के इतका आहे.