मनसेकडून मुख्यमंत्र्यांना 360 शब्दाचं सनसनाटी पत्र लिहून व्यक्त केली ही खंत

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २७ ऑगस्ट । मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना एक दीर्घ पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी धनुर्विद्या शिकणारे खेळाडू आणि त्यांच्या व्यथा मांडल्या आहेत. परंतु या व्यथा मांडताना त्यांनी शिवसेनेवर प्रखर हल्ला चढवला आहे. ज्या चिन्हावर आपण निवडून येता त्या चिन्हामागचा असलेला विचारच आपल्याला संपवावा वाटतो का?, असा सवाल त्यांनी पत्राच्या माध्यमातून ठाकरे यांना केला आहे.

संदीप देशपांडे आपल्या पत्रात म्हणतात, “प्रखर हिंदुत्वाचा पुरस्कार करत बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केलीच शिवाय त्याला साजेसं पक्षचिन्हही निर्माण केलं. ते म्हणजे ‘धनुष्यबाण’.महाभारत ते रामायण काळापासून धनुष्यबाण हे हिंदू धर्मातलं महत्वाचं प्रतिक आहे. परंतु आपला पक्ष महाविकास आघाडी सरकारमध्ये सत्ता भोगत मग्न असल्यापासून हिंदुत्वाचा विसर पडलाय हे आम्हाला मान्यच आहे. परंतु आत्ता आपल्याला धनुष्यबाणाचाही विसर पडलेला दिसतोय हे पाहून वेदना होतात”.

या पत्रामागचं कारण सांगताना देशपांडे म्हणतात, “दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाच्या परिसरात चालत असलेलं धनुर्विद्या प्रशिक्षण अनेक वर्षापासून बंद आहे. हे प्रशिक्षण सुरु असताना चुकीने एक बाण तत्कालीन महापौर निवास परिसरात जाऊन पडला. यात कुणालाही इजा झाली नाही. परंतु तरीही आपण हे धनुर्विद्या प्रशिक्षण बंद करण्याचा आदेश कम ‘फतवा’च काढल्याच समजतं. शिवसेनेचं काय दुर्भाग्य व विरोधाभास म्हणावा, ज्या चिन्हावर आपण निवडून येता त्याच चिन्हामागचा असलेला विचारच आपल्याला संपवावा वाटतोय?

या खेळाडूंची व्यथा मांडताना देशपांडे म्हणतात, धनुर्विद्या शिकणारे खेळाडू आज निराशेत आहेत. त्यांना सरावाला जागा नाही. आपण आमदार आणि सभागृहनेत्यांना आर्चरी क्लबसाठी पर्यायी जागा देण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे आर्चरी क्लबने स्थानिक आमदार, नगरसेविका व सभागृहनेत्या तसेच महापालिकेशी पत्रव्यवहार केला. पण त्याला केराची टोपली दाखवण्यात आली. ज्या धनुर्विद्येसाठी शिवसेना पक्ष प्रमुखांचं ऐकलं जात नसेल तर शिवसेनेला आपलं पक्ष चिन्ह धनुष्यबाण ठेवण्याचा नैतिक अधिकार आहे का? का बाळासाहेबांची शिवसेना आता फक्त हवेतील बाणच मारण्यात पटाईत आहे? असा सवाल खेळाडूंच्या मनात आहे.”

“ही अवस्था जर खेळाडूंची होत असेल तर ऑलिम्पिंकमध्ये भारताला पारितोषिक कसं मिळणार? जे खेळाडूंचं प्रशिक्षण बंद पाडून खच्चीकरण करत आहेत, त्यांना ऑलिम्पिंकमधील खेळाडूंना ‘वर तोंड’ करून शुभेच्छा देण्याचा कोणता अधिकार आहे? ज्या प्रमाणे कॉमनवेल्थ गेम्समध्ये काँग्रेसने भ्रष्टाचार केला होता, कदाचित आघाडीत जाऊन शिवसेनेनेही हाच तर कॉमन मिनिमन प्रोग्राम तर आखला नाही? असा प्रश्न क्रिडा प्रेमींना आणि धनुर्विद्या चाहत्यांना पडला आहे.”

“यासोबतच लवकरात लवकर या खेळाडूंचं प्रशिक्षण सुरू करा, नाहीतर आपलं पक्षचिन्ह जमीन हडपणारा ‘पंजा’ किंवा संधीसाधू ‘घड्याळ’ करा”, अशी मागणीही त्यांनी या पत्रामार्फत केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *