महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २७ ऑगस्ट । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व अधिकाऱयांना फार मोठा दिलासा दिला आहे. सरकारी सेवेतील गट क किंवा गट ड कर्मचाऱयाचे निधन झाल्यास कुटुंबातील पात्र सदस्याला अनुकंपा तत्त्वावर शासकीय सेवेत नियुक्ती देण्यात येते. आता हा निर्णय गट अ व गट बमधील अधिकाऱयांनाही लागू करण्याचा मोठा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. या निर्णयाबद्दल अधिकारीवर्गात समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
कोरोना संकटकाळात कर्तव्य बजावताना अनेक अधिकाऱयांचे निधन झाले आहे. यामुळे अधिकारी संघटनांकडूनही अनुकंपा धोरण लागू करण्याची मागणी होत होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या मागणीप्रमाणे कार्यवाही करण्याची सूचना केली. त्या अनुषंगाने आज यासंदर्भातील प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत आणण्यात आला. या निर्णयामुळे राज्यातील अधिकाऱयांच्या निधनामुळे ओढवणाऱया आर्थिक आपत्तीतून त्यांच्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे.