महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २७ ऑगस्ट । राज्यातील प्रादेशिक वैशिष्टय़े, साधनसामग्रीची उपलब्धता लक्षात घेऊन कोणत्या विभागात कोणते उद्योग सुरू करता येतील, हे निश्चित करण्यासाठी राज्याचा विभागनिहाय ‘उद्योग मॅप’ तयार करण्यात यावा. कोरोनाच्या संकटात राहत असलेल्याच ठिकाणी रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हायला हव्यात. यासाठी येणाऱया उद्योगांनुसार स्थानिकांना प्रशिक्षण द्या. त्यामुळे रोजीरोटीचा प्रश्न सुटेल, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्योग विभागाला देतानाच ‘उद्योग मॅप’नुसार आवश्यक त्या सोयीसुविधा उद्योगांना उपलब्ध करून देण्यात येतील, अशी ग्वाही दिली.
एक लाख कोटी डॉलरची क्षमता गाठण्याच्या दिशेने सुरू असलेल्या राज्याच्या औद्योगिक प्रगतीचा, त्या प्रगतीस पूरक ठरणाऱया पायाभूत सुविधांमध्ये होणाऱया सकारात्मक बदलांचा वेध घेण्यासाठी दै. ‘लोकसत्ता’ने ‘इंडस्ट्रियल काॅन्क्लेव्ह 2021चे आयोजन केले होते, त्याचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.