महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २७ ऑगस्ट । केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या अटकेमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापलेले असताना स्थगित केलेली जनआशीर्वाद यात्रा पुन्हा आजपासून रत्नागिरीतून सुरू होणार आहे. यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी नोटिसा देत अनुचित प्रकार करू नये, अशी सूचना केली आहे. यात्रेदरम्यान राणे काय बोलणार, याची जनतेत उत्सुकता आहे.
दोन दिवसांपूर्वी जनआशीर्वाद यात्रेवेळी राणेंना अटक झाल्यानंतर जिल्ह्यात सेना-भाजप कार्यकर्ते आमनेसामने आले होते. त्यामुळे कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. रत्नागिरीत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी राणेंचे स्वागत फलक फाडले. याप्रकरणी संशयित म्हणून आमदार राजन साळवी यांच्यासह प्रसाद सावंत, प्रकाश रसाळ, परेश खातू, संजय साळवी, प्रशांत साळुंखे यांच्यासह शिवसेनेच्या ८ ते १० पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत.
राणेंच्या अटकेवरून जिल्ह्यातील राजकीय वातावरण अजूनही तापलेले आहे. या परिस्थितीत दोन दिवसांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे पुन्हा जन आशीर्वाद यात्रेबरोबर रत्नागिरी शहरात येत आहेत. शहरातील विविध भागांत स्वागत, सभा कार्यक्रम होणार आहेत. जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आहे. सार्वजनिक हिताच्या दृष्टीने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व प्रसार रोखणे आणि त्यासाठी उपाययोजना प्रशासनाने हाती घेतलेल्या आहेत.
जन आशीर्वाद यात्रा कार्यक्रमाकरिता कार्यकर्त्यांच्या वाहनांची गर्दी होण्याची शक्यता आहे. या परिस्थितीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास किंवा सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होण्याची शक्यता लक्षात घेऊन, मनाई आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधितांना जबाबदार धरुन कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. शहर पोलिसांनी शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना प्रतिबंधात्मक नोटीस काढली आहे. दरम्यान, पोलिसांनी रत्नागिरी शहरात बुधवारी (ता. २५) सायंकाळी संचलनही केले.