महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २७ ऑगस्ट । घोषणाबाजी, पोस्टरबाजी, हाणामारी, गुन्हे, आरोप प्रत्यारोप हे मागील काही दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळामधील सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या गोष्टी आहेत. अर्थात या चर्चांना कारण आहे राणे विरुद्ध ठाकरे संघर्ष. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केलेली टीका आणि त्यानंतर त्यांना झालेली अटक व सुटका प्रकरणानंतर सलग तिसऱ्या दिवशीही शिवसेना विरुद्ध राणे हा शाब्दिक संघर्ष सुरु आहे. आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी भाष्य करताना राणेंवर टीका केली. मात्र यावेळेस एका प्रश्नावर उत्तर देताना राऊत यांनी राणे हे शिवसेना आणि भाजपा एकत्र येण्यासाठी प्रयत्न करत आहेत, असं वक्तव्य केलं आहे. आधी राऊत यांनी राणेंवर सडकून टीका केली आणि पत्रकारांचा निरोप घेताना हे वक्तव्य केलं.
पत्रकारांशी संवाद साधताना आधी राऊत यांनी राणेंवर भाजपामध्ये बाहेरुन आलेले नेते असं म्हणत निशाणा साधाला. बाहेरुन आलेल्या लोकांनी शिवसेना भाजपामधील संबंध बिघडवल्याची टीकाही राऊत यांनी केली. यापूर्वी कधीच शिवसेना भाजपाचे कार्यकर्ते आमने सामने आले नव्हते. मात्र बाहेरुन आलेल्यांना दोन पक्षांमध्ये संघर्ष हवा असल्याने अशी वक्तव्य केली जात असल्याचा आरोप राऊत यांनी केली. बाळासाहेब ठाकरे आणि अटलजी, बाळासाहेब आणि अडवाणी यांचे संबंध कसे होते तसेच बाळासाहेब, त्यांचे पुत्र उद्धव ठाकरे यांचे नरेंद्र मोदींसोबत कसे संबंध आहेत हे आम्हाला माहितीय. मात्र ज्यांना हे माहिती नाहीय तेच लोक चिखलफेक करत असल्याचा आरोप राऊतांनी केलाय.