महाराष्ट्र २४; मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला पश्चिम आफ्रिकेच्या सेनेगल इथे अटक करण्यात आली आहे. भारतीय तपास यंत्रणांच्या मदतीने ही कारवाई केली असून रवी पुजारीला भारतात आणण्याच्या सर्व कागदपत्रांचे काम पूर्ण झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
भारताकडून रवी पूजारीच्या प्रत्यार्पणाची तयारी केली जात आहे. आज रविवारी त्याला भारतात आणण्यात येईल, असे सुत्रांकडून समजते आहे. कर्नाटक पोलिस आणि रॉचे अधिकारी सेनेगलमध्ये हजर असल्याचेही सूत्रांनी म्हटले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारी अँटोनी फर्नांडिसच्या नावाने पासपोर्ट बनवून सेनेगलमध्ये वास्तव्य करत होता. हा पासपोर्ट १० जुलै २०१३ रोजी पासून ते ८ जुलै २०२३ पर्यंत वैध आहे. पासपोर्टनुसार, तो एक व्यावसायिक एजंट आहे. भारतीय गुप्तचर संस्था रॉ सध्या रवी पुजारीला भारतात आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. जेव्हा रवी पुजारी शेवटचा पळाला होता तेव्हा तो सेनेगल येथून पळून गेल्याची माहिची समोर येत आहे. रवी पुजारीला भारतात आणले जाईल तेव्हा तो कर्नाटक पोलिसांच्या ताब्यात राहिल, अशी माहिती सूत्रांकडून समजत आहे.
जून २०१९ मध्ये फरार
रवी पुजारी हा आफ्रिकी देशात सेनेगलमध्ये राहत होता. सेनेगल येथे भारतीय एजन्सीच्या इनपुटवरून २१ जानेवारी २०१९ रोजी अटक करण्यात आली होती. मात्र सेनेगल कोर्टाने पुजारीला जामीन दिला होता. त्यानंतर तो फरार होता.