महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३० ऑगस्ट । पुणे येथील भोसरी एमआयडीसीतील भूखंड खरेदीप्रकरणी माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांची पाच कोटी रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. ईडीच्या या कारवाईवर प्रतिक्रया देताना एकनाथ खडसे अक्रमक झाले असून योग्य वेळ आली की मीही सीडी लावणार असल्याचा इशारा त्यांनी भाजपला दिला आहे.
ईडीने खडसे यांच्या मालमत्तेवर टाच आणताना त्यांचा लोणावळा येथील बंगला, जळगाव येथील तीन जमिनी आणि फ्लॅट जप्त केले आहेत. तसेच बँकेतील 86 लाखांच्या ठेवी गोठवल्या आहेत. त्यावर प्रतिक्रिया देताना आपण योग्य वेळी सीडी लावणार असल्याचे स्पष्ट केले आहे. माझ्यामागे ईडी लावली की मी सीडी लावणार असे म्हणालो होतो, ते खरे आहे. गेल्या पाच-सहा महिन्यांपासून ती सीडी पोलिसांकडे दिली आहे. पोलीस त्याची चौकशी करत असून त्याचा अहवाल आला की मी तो सीडी लावून जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, त्याचा ईडीच्या चौकशीवर परिणाम होईल असे बोलणार नसल्याचेही खडसे यांनी स्पष्ट केले आहे.
सध्याची परिस्थिती पाहिली असता खान्देशातील नेतृत्व संपवण्याचे षड्यंत्र रचल्याचे दिसत असल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे. 50 वर्षांपूर्वीची आपल्याकडे वडिलोपार्जित 60 एकर जमीन आहे. गेल्या 40 वर्षांत आपण एवढी विकासकामे केली आहेत की, आपल्या पासंगालाही कुणी पुरणार नाही असेही खडसे म्हणाले. दरम्यान, जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी सर्वपक्षीय पॅनल उभे करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.