महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३० ऑगस्ट । राज्यातील वीज ग्राहकांना आता सुट्टीच्या दिवशी वीज बिल भरता येणार आहे. ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून महावितरणने सुट्टीच्या दिवशीही सर्व वीज बिल भरणा केंद्रे सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. महावितरणचे राज्यभरातील वीज ग्राहकांकडे जवळपास पन्नास हजार कोटी रुपयांहून अधिव वीज बिलाची थकबाकी आहे. त्याच्या वसुलीला चालना मिळावी, नोकरदार वीज ग्राहक आपल्या सुट्टीच्या दिवशी वीज बिल भरण्यासाठी येतात. मात्र त्याच दिवशी वीज बिल भरणा केंद्रे बंद असल्याने ते बिलाचा भरणा करून शकत नाहीत. त्यामुळेही वीज बिल थकबाकी वाढत आहे. त्याची दखल घेत महावितरणने आपली राज्यभरातील सर्व वीज बिल भरणा केंद्रे सुट्टीच्या दिवशीही सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, ग्राहकांनी रोखीने वीज बिल भरण्याऐवजी महावितरणच्या संकेतस्थळावर ऑनलाइन किंवा मोबाईल अॅपद्वारे वीज बिल भरावे, असे आवाहन केले आहे.