महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३० ऑगस्ट । यवतमाळ-वाशिमच्या शिवसेनेच्या खासदार भावना गवळी (MP Bhavana Gawali) यांच्या पाच संस्थावर ईडीने छापा (ED raid on Bhavana gawali organization) टाकला आहे. बालाजी पार्टीकल बोर्ड या कारखान्यात (Balaji particle board facotry) घोटाळा झाल्याचा आरोप देखील गवळी यांच्यावर आहे. तसेच त्यांच्या संस्थेतून काही कोटी रुपये चोरीला गेल्याची तक्रार होती. त्यानंतर ही छापे टाकल्याची माहिती आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या आरोपानंतर वाशिम जिल्ह्यात ईडीने कारवाई केल्याची चर्चा सुरु आहे.
बालाजी पार्टीकल बोर्ड कारखान्याच्या संदर्भात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सक्तवसूली संचालनालयाकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत ईडीने सोमवारी सकाळी 11 वाजता चार पथकात चार ठिकाणी धडक दिली. यामधे रिसोड तालुक्यातील देगाव येथील बालाजी पार्टीकल बोर्ड कारखाना, दोन शिक्षण संस्था तसेच मालेगाव तालुक्यातील शिरपूर येथील एका शिक्षण संस्थेचा समावेश आहे. सध्या कारवाई सुरूच आहे. या कारवाईने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. ईडीची ही कारवाई राजकीय हेतूने प्रेरित असून भाजप त्याचा गैरवापर करीत असल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला आहे.
दरम्यान, बालाजी पार्टीकल बोर्डाबाबत अनियमितता झाल्याचा आरोप करीत भाजपचे माजी खासदार किरिट सोमय्या यांनी रिसोड तालुक्यातील देगाव येथील बालाजी पार्टीकल बोर्ड कारखान्याला भेट दिली होती. सध्या बालाजी पार्टीकल बोर्ड कारखान्याचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. मात्र, तरीही भाजपचे नेते किरिट सोमय्या यांनी देगाव येथे भेट देण्याचा प्रयत्न केला असता तिथे उपस्थित शेतकरी, महिला व शिवसैनिकांनी प्रचंड घोषणाबाजी केली होती. तसेच किरीट सोमय्या यांच्या वाहनावर शाई फेकली होती. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली आणि किरिट सोमय्या यांनी तेथून काढता पाय घेतला.