महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३१ ऑगस्ट । राज्यात रात्रीची संचारबंदी लावण्याचा निर्णय अजून झाला नाही. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे टास्क फोर्स आणि आरोग्य विभाग यांच्याशी योग्य वेळी चर्चा करून निर्णय घेतील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज 30 ऑगस्ट रोजी जालन्यात दिली. केंद्राने केरळ आणि महाराष्ट्रात रात्रीची संचारबंदी लावावी, अशी शिफारस केलेली आहे. मात्र, मुख्यमंत्रीच याबाबत निर्णय घेतील, असे टोपे यांनी स्पष्ट केले.
सध्या मागील चार आठवडय़ांचा कोरोनाच्या मृत्यूदराचा अहवाल पाहिला तर असे आढळून आले की, त्याचा आलेख बराच खाली आलेला आहे. परंतु हा आलेख पुन्हा खाली आणण्यावर आरोग्य विभाग प्रयत्नशील आहे. मागील काही दिवसांत केरळमध्ये अचानक कोरोनाचे रुग्ण वाढलेले दिसून आला. त्याचे कारण म्हणजे तेथे ओणम हा सण मोठय़ा प्रमाणात साजरा करण्यात आला. तसेच तेथील सरकारने टेस्टिंग भरमसाठ वाढवल्या. या दोन कारणांमुळे केरळमधील कोरोना रुग्णांची संख्या वाढलेली आहे. असे स्पष्टीकरण आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले. त्या पार्श्वभूमीवर आपल्याकडे सुध्दा सध्या सणावाराचे दिवस आहेत आणि केरळसारखी परिस्थिती आपल्याकडे उद्भवू नये, म्हणून सावधगिरी बाळगत आहोत. आपण सणावारांच्या काळात परिस्थितीवर बारीक नजर ठेऊन आहोत, असे टोपे म्हणाले.