महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३१ ऑगस्ट । इन्कम टॅक्सचे अधिकारी असल्याचे सांगत सोनेविक्री करणाऱया व्यापाऱयाचे मोटारीतून अपहरण करीत तब्बल 20 लाखांची रोकड आणि 30 तोळे लुटणाऱया टोळीचा भारती विद्यापीठ पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. चोरटय़ांकडून रोकड, दागिने, आलिशान कार असा 34 लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ही घटना 26 ऑगस्ट मध्यरात्री जांभूळवाडी रस्त्यावर घडली.
मुख्य आरोपी व्यास गुलाब यादव (34, रा. आंबेगाव), भय्यासाहेब विठ्ठल मोरे, किरण कुमार नायर, मारुती अशोकराव सोळंके, उमेश अरुण उबाळे, श्याम अच्युत तोरमल, सुहास सुरेश थोरात, रोहित संभाजी पाटील, अशोक जगन्नाथ सावंत यांना अटक करण्यात आली. नंदकिशोर कांतिलाल वर्मा (41, रा. दत्तनगर) यांनी तक्रार दिली आहे. अशी माहिती पोलीस उपायुक्त सागर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी एसीपी सुषमा चव्हाण, वरिष्ठ निरीक्षक जगन्नाथ कळसकर उपस्थित होते.
आलिशान मोटारीतून आलेल्या पाचजणांनी नंदकिशोर यांना आम्ही ‘इन्कम टॅक्स अधिकारी आहोत, बेकायदेशीरपणे सोन्याचा धंदा करता, सरकारची फसवणूक करता’, असे म्हणत दोघांना जबरदस्तीने मोटारीत बसवले. त्यांना दूरवर नेत 75 लाखांची मागणी केली. खुनाची धमकी देत त्यांच्याकडून 30 तोळे सोने आणि 20 लाखांची रोकड उकळली होती.
तीन आरोपी इंजिनीअर
व्यापाऱयाला लुटणाऱयांपैकी तीन आरोपी इंजिनीअर असून, कमी वेळेत जास्त पैसा कमविण्यासाठी त्यांनी अपहरणाचा डाव रचल्याचे तपासात उघडकीस आले. भय्यासाहेब मोरे, किरण नायर, श्याम तोरमल अशी त्यांची नावे आहेत.