महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १ सप्टेंबर । राज्यात मंगळवारच्या (31 ऑगस्ट) जोरदार पावसाच्या हजेरीनंतर आज (1 सप्टेंबर) पावसाचा जोर काहीसा कमी झालेला दिसत असला तरी अनेक ठिकाणी पावसाची रिमझिम सुरू आहे. पुराने थैमान घातलेल्या चाळीसगाव, कन्नड भागातही पावसानं काहीशी उघडीप दिली असून या भागातील जीवनमान पूर्ववत होत आहे. पाण्याखाली गेलेले पूलही वाहतुकीसाठी सुरू होत आहेत. असं असलं तरी हवामान खात्यानं 2-3 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे पावसाची शक्यता कायम आहे.
पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतल्याने चाळीसगावमधील परिस्थिती पूर्वपदावर आली आहे. तितूर नदीवरील घाटरोड पूल वाहतुकीसाठी खुला झालाय. रात्रीपर्यंत हा पूल पाण्याखाली होता. चाळीसगाव शहराच्या मध्यभागी असणारा हा शहराला जोडणारा पूल आहे. आता नदीचं पाणी ओसरल्यानं परिसरात मोठ्या प्रमाणावर कचरा साचलाय.
दरम्यान, मुंबई हवामान विभागाने मंगळवारी (31 ऑगस्ट) सॅटेलाईट आणि रडार इमेजेसच्या आधारे महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केलाय. पुणे, जळगाव, अहमदनगर, सोलापूर, औरंगाबाद, जालना, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी आणि बीडमध्ये पावसाचा जोर अधिक असेल असंही नमूद करण्यात आलंय. पालघर, रायगड, ठाणे या कोकणातील भागात विजेचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.
हवामान विभागाचे अधिकारी के. एस. होसाळीकर म्हणाले, “छत्तीसगडवर 30 ऑगस्टला कमी दाबाचे क्षेत्र आहे. 15 अंश उत्तरवर पूर्व-पश्र्चिम शियर जोन आहे. याचा प्रभाव म्हणून महाराष्ट्र राज्यासाठी IMD पुढील 3-4 दिवसांसाठी काही इशारे देत आहे. काही ठिकाणी मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची शक्यता आहे. यात मुंबई, ठाणे, उत्तर कोकणाचाही समावेश आहे.”