महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २ सप्टेंबर । मध्य महाराष्ट्राच्या उत्तर भागात वाऱ्याची स्थिती काही प्रमाणात सक्रिय आहे. त्यामुळे पुणे (Pune) आणि परिसरात गेले 2-3 दिवसांपासून कायम असणारी ढगाळ वातावरणाची स्थिती आजही कायम राहणार आहे. आज दुपारनंतर काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी (Pune Rain) कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. काल शहरात सकाळपासूनच आभाळी वातावरण होतं. शिवाजीनगर वेधशाळेत काल सकाळी साडेआठ वाजेपर्यंत 1.7 मिमी पावसाची नोंद झाली आहे. शहरात आतापर्यंत 387.3 मिमी पाऊस पडल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. (The meteorological department has forecast light showers in Pune today)
पुढच्या काही दिवसांत राज्यात पावसाचा जोर कमी राहणार आहे. आज कोकणातल्या पालघरसह विदर्भात बुलडाणा, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ वर्धा, नागपूर या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पश्चिम महाराष्ट्रात आतापर्यंत सरासरी पाऊस झाला आहे. सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्रातल्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत कमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. सप्टेंबरमध्येही सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. राज्यात मराठवाड्यात सर्वाधिक पाऊस झाला आहे. सप्टेंबर महिन्यात मराठवाड्यातल्या बहुतांश भागात सरासरीपेक्षा अधिक किंवा सरासरीएवढा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. मराठवाड्याच्या काही भागात मात्र, सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यताही हवामान खात्याने वर्तवली आहे.