महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३ सप्टेंबर । कोरोना संकटामुळे गर्तेत फसलेल्या रिअल इस्टेट क्षेत्राला आता पुन्हा एकदा सुगीचे दिवस येण्याचे संकेत मिळत आहेत. कारण नुकत्याच सरलेल्या जून तिमाहीत मालमत्तांच्या विक्रीचे प्रमाण दुप्पट झाल्याची माहिती समोर आली आहे. देशातील आठ प्रमुख शहारांमध्ये नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच तिमाहीत 6.85 कोटी वर्ग फूट इतक्या घरांची विक्री झाली. मे महिन्यात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे जून तिमाहीत गेल्यावर्षीच्या तुलनेत घर विक्रीचे प्रमाण कमी असले तरी ते दिलासादायक असल्याचे सांगितले जाते.
गेल्या आर्थिक वर्षाती शेवटच्या तिमाहीत 8.47 कोटी वर्ग फूट इतक्या घरांची विक्री झाली होती. मात्र, त्यानंतर कोरोनाची दुसरी लाट आल्याने ग्राहकांनी घर खरेदीकडे पुन्हा पाठ फिरवली होती. परंतु, गेल्या काही काळात लसीकरणाचा टक्का वाढल्याने परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येताना दिसत आहे. ICAR या रेटिंग एजन्सीच्या माहितीनुसार, 2020-21 मधील पहिल्या तिमाहीत 3.37 कोटी वर्ग फूट घरांची विक्री झाली होती. या तुलनेत यंदाच्या जून तिमाहीत घरांची विक्री दुप्पट झाली आहे. लसीकरणाचा वेग आणखी वाढल्यानंतर अर्थव्यवस्था वेगाने रुळावर येईल. त्यामुळे आगामी काळात घरविक्रीचे प्रमाण आणखी वाढेल, असा या क्षेत्रातील जाणकारांचा अंदाज आहे.
ICAR च्या माहितीनुसार, गृहकर्जाचा व्याजदर हा गेल्या काही वर्षांतील निच्चांकी पातळीवर आहे. त्यामुळे अनेकजण घरखरेदीसाठी उत्सुकता दाखवत आहेत. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत दैनंदिन व्यवहार कमी प्रमाणात ठप्प झाले होते. त्यामुळे मोजके व्यवहार वगळता इतर गोष्टी सुरु राहिल्या. याचा फायदा रिअल इस्टेट क्षेत्राला झाला.
आयटी क्षेत्राकडून मागणी
कोरोनाकाळात बहुतांश क्षेत्रांना फटका बसला असला तरी आयटी क्षेत्राला सुगीचे दिवस आले होते. त्यामुळे या क्षेत्रात मोठ्याप्रमाणावर रोजगारनिर्मिती झाली. या सगळ्याचा फायदा घरबांधणी क्षेत्रालाही झाला आहे.