निवडणूक आयोग : राज्यात निघाले तीन लाख दुबार मतदार; फोटोंमुळे शोधण्यात आयाेगाला यश

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३ सप्टेंबर । केंद्रीय निवडणूक आयोगाने फेस रीडिंगच्या साॅफ्टवेअरचा वापर सुरू केल्यामुळे दोन ठिकाणी नोंदणी करणाऱ्या मतदारांचा शोध घेणे सोपे झाले आहे. राज्यात अजूनही तीन लाख दुबार नोंदणीचे मतदार असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी  दिली.

मतदार नोंदणीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने घेतला आहे. पण मतदार नाव नोंदणीमध्ये युवा पिढी अजूनही उदासीन असल्याचे आढळून आले आहे. राज्यात १८ ते १९ वयोगटातील साडेतीन टक्के मतदार आहेत. पण त्यापैकी केवळ एक टक्का युवकांची नावे मतदार यादीत नोंद झाली आहेत. २० ते २९ वयोगटातील लोकसंख्या १८ टक्के आहे, यापैकी १३ टक्के लोकसंख्या मतदार यादीच्या बाहेर आहेत. त्यामुळे मतदार नोंदणीसाठी मोठ्या प्रमाणावर जागृतीची गरज आहे. श्रीकांत देशपांडे म्हणाले की, दुबार नोंदणीचे राज्यात चार लाख मतदार होते. पण आता फेस रीडिंगचे सॉफ्टवेअर आणल्यामुळे दुबार नोंदणीचे मतदार शोधून काढणे सोपे होते. नावामध्ये साधर्म्य असू शकते, पण फेस रीडिंगच्या तंत्रज्ञानामुळे चेहरा ओळखता येतो. यामुळे दुबार नोंदणी केलेला मतदार आढळल्यास त्याचे नाव आपोआप वगळले जाते. पूर्वी ४ लाख दुबार नोंदणीचे मतदार होते. त्यातील एक लाख मतदारांची दुबार नोंदणी रद्द झाली आहे. आता ही संख्या तीन लाखांवर आली आहे.

मतदार यादीत नाव नोंदणी करण्याबाबत जनजागृती करण्यासाठी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय व बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समितीच्या वतीने गणेशोत्सवाच्या काळात “उत्सव गणेशाचा-जागर मताधिकाराचा’ ही घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी ७३८५७६९३२८ किंवा ८६६९०५८३२५ या क्रमांकावर संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *